वेळ येतेच…आणि तेव्हा कळतं....!
वेळ येतेच…आणि तेव्हा कळतं....!
माणुसकी तिथेच मरते, जिथे दुसऱ्याच्या दुःखाचा लोकांना खेळ वाटतो. जिथे अश्रूंना किंमत नसते, वेदनांवर हसले जाते आणि कोसळणाऱ्या माणसाकडे मदतीचा हात न देता तमाशा पाहिला जातो. माणूस प्रगती करत गेला, पण त्याच वेगाने त्याच्या मनातून संवेदनशीलता हरवत गेली.
आज एखादा माणूस दुःखात असला की लोक विचारतात.“काय झालं?” मदतीसाठी नाही, तर चर्चेसाठी. त्याच्या वेदना चहाच्या कपात ओतून गप्पांचा विषय बनवल्या जातात. कोणाच्या अपयशावर समाधान मानलं जातं, तर कोणाच्या अश्रूंवर टोमणे मारले जातात. माणसाचं दुःख हे आज मनोरंजनाचं साधन झालं आहे.
पण वेळ… वेळ फार निर्दयी नसते, ती फक्त न्याय्य असते. ती कुणाला वाचवत नाही, कुणालाही वगळत नाही. आज जो दुसऱ्याच्या वेदनेवर हसतो, उद्या त्याच वेदनेत अडकलेला असू शकतो. आज जो सुरक्षित वाटतो, उद्या तोच असहाय्य उभा असू शकतो. आयुष्य प्रत्येकाला शिकवतं, फक्त धडा कधी मिळतो याचा फरक असतो.
तेव्हा कळतं की दुःखात शब्द नको असतात, फक्त समजून घेणारी नजर पुरेशी असते. टीका नको असते, तर आधार हवा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी तरी आपल्यासोबत उभं आहे, ही भावना हवी असते.
माणुसकी म्हणजे मोठी मदत नव्हे, तर छोटा आधार असतो. एखाद्याच्या वेदनेत सामील होणं, त्याच्या अश्रूंना हसण्याऐवजी शांतपणे पुसणं, आणि पडलेल्याला उठवण्यासाठी स्वतः थोडं वाकणं यालाच माणुसकी म्हणतात.
म्हणूनच आज दुसऱ्याच्या दुःखाकडे खेळ म्हणून पाहण्याऐवजी, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित उद्या वेळ आपल्यावर आली तरी आपल्याला एक माणूस तरी जवळचा मिळेल. कारण वेळ प्रत्येकाची येते… फक्त थांबून पाहावं लागतं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा