साधेपणातून साधनेपर्यंत जयेश वाघ यांची गोसेवेची कथा....!


साधेपणातून साधनेपर्यंत जयेश वाघ यांची गोसेवेची कथा....!

चाळीसगाव तालुक्यातील दहिवदसारख्या लहानशा गावात, एका सर्वसामान्य कुटुंबात जयेश संभाजी वाघ यांचा जन्म झाला. वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते, तर घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. आयुष्याची सुरुवातच संघर्षांनी वेढलेली होती; परंतु या प्रतिकूल परिस्थितीत ही एका लहान मुलाच्या मनात एक वेगळे स्वप्न फुलत होतं.गोमातेच्या निःस्वार्थ प्रेमाची आणि सेवा करण्याची उत्कट इच्छा.
बालपणापासूनच गायींकडे पाहताना जयेश यांचे डोळे काहीतरी वेगळ्या चमकाने भरलेले दिसायचे. इतर मुलं खेळण्यात रमलेली असताना, जयेश मात्र गायींच्या सान्निध्यात शांतता आणि समाधान शोधत असे. त्यांच्या हृदयात गायींबद्दलची आपुलकी होती, मनात सेवाभाव होता, आणि बालवयातच गोसेवेची बीजं रुजली होती. 
जणू काही त्यांच्यासाठी ही साधना जन्मजात होती.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी शिक्षणाचा मार्ग कधीही सोडला नाही. मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी फार्मसीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. 
स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर अनेक जण सुरक्षित नोकरीचा मार्ग निवडतात, पण जयेश वाघ यांनी मनाचा आवाज ऐकला. गोमातेवरील प्रामाणिक प्रेम आणि सेवाभावच त्यांनी जीवनाचा ध्येय बनवले.

जळगाव शहरातील खोटे नगर येथे त्यांनी “मोहन शक्ती गोशाळा” सुरू केली. ही गोशाळा केवळ गायींचा संगोपन करण्याचे ठिकाण नव्हती, तर त्यांच्या बालपणीच्या स्वप्नाचे प्रत्यक्ष साकार रूप होते. पुणे येथील नंदू गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी लाल कंधारी या देशी जातीच्या गायींचे संगोपन, संवर्धन आणि त्यांच्या वंशाची जतन करण्याचे कार्य सुरू केले. गोसेवा ही फक्त गायी पाळण्यापुरती मर्यादित नसून, त्यांची जाती, वंशपरंपरा आणि देशी जातींचा वारसा जतन करण्याचे महान कार्य आहे.हे जयेश वाघ यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोन, सातत्यपूर्ण परिश्रम, आणि मनापासूनची सेवा या त्रिसूत्रीवर आपलं कार्य उभं केलं. गोसेवा ही फक्त कर्म नाही, तर एक साधना आहे, एक निष्ठा आहे, जी मनापासून केली जाते तेव्हाच खरी परिणामकारक ठरते.आणि मग आला तो सुवर्णक्षण १ फेब्रुवारी २०२६ रोजी, जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात, जयेश यांनी संगोपन केलेल्या देशी वासरांना जातीय गुणधर्मांच्या आधारे जळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळाला. हा पुरस्कार केवळ जयेश यांचा नव्हता; हा त्या प्रत्येक मनाचा गौरव होता, ज्यांनी गोसेवेवर विश्वास ठेवला आणि निःस्वार्थ प्रेमात सामील झाले. या क्षणाने त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाला मान्यता मिळाली, आणि त्यांच्या मेहनतीला औपचारिक गौरव लाभला.

आज मोहन शक्ती गोशाळा ही केवळ गायींच्या संगोपनाचे केंद्र नाही, तर प्रेरणास्थान आहे. जिथे युवा पिढीला शिकवले जाते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, मनात प्रामाणिक ध्यास, सेवाभाव आणि निष्ठा असेल, तर स्वप्न पूर्ण होणे निश्चित आहे. जयेश संभाजी वाघ यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की गोमातेची सेवा ही फक्त कर्म नाही, ती एक साधना आहे.जिच्या माध्यमातून व्यक्तीचे आयुष्य समृद्ध होते, समाजाला लाभ मिळतो, आणि देशी जातींचे संवर्धन होते.

जयेश वाघ यांची गोसेवा ही प्रेरणा आहे; त्यांच्या निःस्वार्थ कार्याला मनापासून वंदन, आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. त्यांच्या हृदयस्पर्शी कथेतून हे स्पष्ट होते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, मनातील प्रामाणिक ध्यास आणि निःस्वार्थ प्रेम व्यक्तीला असामान्य उंचीवर नेऊ शकते.गोसेवेच्या या निःस्वार्थ यज्ञाला सलाम!जयेश संभाजी वाघ यांचे कार्य अनेक तरुणांसाठी दीपस्तंभ ठरो.हीच खरी सदिच्छा.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !