संतोष शेंडे एक आदर्श ग्रामीण पत्रकार


संतोष शेंडे एक आदर्श ग्रामीण पत्रकार

                  ग्रामीण भागातील पत्रकारिता ही शहरातील पत्रकारितेपेक्षा अधिक आव्हानात्मक आणि थेट लोकांशी निगडित असते.एका आदर्श ग्रामीण पत्रकाराकडे केवळ लेखणीचे कौशल्य असून चालत नाही, तर त्याला सामाजिक भान आणि ध्येयवाद असणेही तितकेच महत्त्वाचे असते.जे टाकरखेडा संभू,ता. भातकुली,जि.अमरावतीचे धडाडीचे पत्रकार संतोष शेंडे यांच्याकडे आहे.

       ​ग्रामीण भागातील आदर्श पत्रकाराला स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असली पाहिजे .
ग्रामीण पत्रकाराला आपल्या परिसरातील भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची पूर्ण माहिती असणे आवश्यक असते.शेती, पाणीप्रश्न,आरोग्य सेवा आणि स्थानिक प्रशासकीय त्रुटी यांवर त्याची पकड असणे गरजेचे आहे.या सर्व गोष्टी पत्रकार संतोष शेंडे जवळ असल्यामुळेच ते आज पत्रकारितेच्या क्षेत्रात
 नावारुपास आलेले आहेत.

      ​तटस्थता आणि निर्भीडपणा ग्रामीण पत्रकाराच्या अंगी असणे आवश्यक असते.​ग्रामीण भागात अनेकदा राजकीय दबाव किंवा गटबाजी असते.अशा वेळी कोणत्याही पक्षाची किंवा व्यक्तीची बाजू न घेता 'सत्य' मांडण्याचे धाडस आदर्श पत्रकाराकडे असावे लागते.अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना तो निर्भीड असावा.​केवळ ऐकीव माहितीवर बातमी न बनविता,त्या घटनेच्या मुळाशी जाऊन तथ्य शोधणे आवश्यक असते.सरकारी योजनांचे नियम,जीआर आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करून बातमी ते देतात त्यामुळे ती अधिक परिणामकारक ठरते.संतोष शेंडे यापैकीच एक आदर्श पत्रकार आहे .
"सत्य सांगायला
कधी डगमगत नाही ॥
वाकड्या वाटेने 
कधी जात नाही ॥
ग्रामीण मातीचा 
गंध प्रत्येक शब्दाला ॥
जागृत ठेवतो संतोष
स्वतःच्या पत्रकारितेला ॥

      वृत्तपत्रे किंवा प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.​लोकशाहीच्या सुरळीत कामकाजासाठी विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका हे तीन मुख्य स्तंभ असले तरी, या तिघांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.​ग्रामीण पत्रकार हा जनतेचा कैवारी मानला
जातो.लोकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि प्रशासनाचे निर्णय लोकांपर्यंत सोप्या भाषेत मांडणारा संतोष आज टाकरखेडा संभूला मिळाला आहे .
"तलवारीपेक्षाही धारदार 
 पत्रकारांची असावी लेखणी ।
अन्यायाला वाचा फोडते ती,
संतोष शेंडेंची शब्द मांडणी ॥

       ग्रामीण वाचकांशी संवाद साधताना भाषा क्लिष्ट नसावी. स्थानिक बोलीभाषेचा वापर करावा,पण प्रमाण भाषेत शुद्ध लेखन करणे ही एका सुजाण पत्रकाराची ओळख आहे. पत्रकारिता कशाला म्हणता येईल? तर"दोष दाखवणे सोपे असते, पण दिशा दाखविणे हीच खरी पत्रकारिता आहे."जी संतोष जवळ आहे.
​कामात पारदर्शकता आणि नैतिक मूल्यांची जपणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. 'पेईड न्यूज' किंवा कोणाच्या तरी दबावाखाली येऊन चुकीची माहिती पसरवणे संतोष टाळतो.​केवळ बातम्याच नव्हे, तर आरोग्य, शिक्षण, शेती आणि संस्कृती याविषयी माहिती देऊन समाजाचे प्रबोधन पत्रकारांनी करायला पाहिजे ते संतोष शेंडे करीत आहे. 

           बालपणापासूनच वृत्तपत्राशी नाते जोडणारा, ग्रामनाथांच्या समस्या जाणून त्याला वृतपत्रातून वाचा फोडणारा ग्रामीण भागातील भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू या ग्रामात जन्मलेल्या पत्रकार संतोष 
शेंडेने वडिलांच्या वृत्तपत्रकारितेच्या व्यवसायाला लहानपणापासूनच स्वतःला वाहून घेतले.तो मागील पंचवीस वर्षांपासून या वृत्तपत्राच्या व्यवसायात मग्न आहे. अमरावती बस डेपोत पेपर विक्री करणारा संतोष आज आदर्श ग्रामीण पत्रकार बनला.   

            टाकरखेडा संभू  येथे वडील अशोकराव शेंडे यांची पेपर एजन्सी चालवून मोठ्या प्रमाणात पेपर विक्रीचा व्यवसाय त्याने वृद्धिंगत केला. फक्त पत्रकारिता हेच ध्येय न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या वृत्तपत्रातून सोडवण्याचे काम केले."जिथे पोहोचत नाही शासन, तिथे माझा शब्द पोहचतो,  शेतकऱ्याच्या घामाचा हिशोब माझ्या लेखणीत उतरवितो."

       अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या घामाचा हिशोब लेखणीत
उतरविणारा संतोष ऊन, वारा,पाऊस याची तमा न बाळगता वर्तमानपत्र प्रत्येक घरी
पोहचवून,वर्तमानपत्राच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविणारा ग्रामीण पत्रकार ग्रामनाथांच्या घराघरात मनामनात जाऊन बसला.तो त्याच्या प्रामाणिकपणामुळे
"पत्रकारिता हा 
फक्त व्यवसाय नाही,
समाजाप्रती निभावलेलं
एक पवित्र व्रत आहे."
     हे व्रत निभावण्याचा प्रयत्न संतोष करीत आहे.
"ग्रामीण भागातील पत्रकार
 हा केवळ बातमीदार नसून 
तो समाजाचा आरसा 
आणि अन्यायाविरुद्ध 
लढणारा एक योद्धा असतो."
हा योद्धा म्हणजे संतोष शेंडे.

              पत्रकारितेमधील अन्यायाच्या विरुद्ध न्याय देणाऱ्या त्याच्या लढाईमुळे सामान्य जनतेच्या समस्या संतोषच्या घरापर्यंत पोहोचू लागल्या आणि त्या सोडविण्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करू लागला व  जनतेला  त्या समस्येतून तो मुक्त करू लागला.एखाद्या अधिकाऱ्याने जर एखाद्या सर्वसामान्यांची अडवणुक केली तर संतोष लगेच अधिकाऱ्याला फोन लावून"साहेब त्या समस्यांमध्ये काय अडचण आहे?आपण का  त्या माणसाचे काम थांबविले?" असा दम भरला की त्या सर्व सामान्य माणसांची काम अतिशय तातडीने झालेच पाहिजे, यामुळेच सर्व लोकांना राजकीय लोकांपेक्षाही संतोष प्रिय वाटायला लागतो.
"ना भीती सत्तेची मला,
ना लोभ कोणत्याही धनाचा ॥
मी तर फक्त वारसदार आहे,
आदर्श पत्रकारितेचा ॥

      अशा या फक्त पत्रकारितेचा वारसदार असलेल्या संतोषने आत्मनिर्भर होत नोकरी करणाऱ्यालाही लाज वाटेल असा आपल्या व्यवसायाला जोड देत दूध,दही,पनीर,श्रीखंड ची एजन्सी सुरू केली यातूनच तो आपल्या कुटुंबाची उपजीविका करतो.अतिशय जमिनीवरची पत्रकारिता जर बघायची असेल तर ती म्हणजे संतोष शेंडेची.सर्वसामान्यांच्या ज्वलंत मुद्द्याला लिखाणाची धार देऊन त्याला बातम्यांचे स्वरूप देऊन प्रकाशित करण्याचा जो सपाटा संतोष शेंडे ने लावला त्यामुळे संपूर्ण पत्रकारितेत जिल्हाभरात संतोष शेंडे ची ओळख व प्रतिमा निर्माण झाली यामुळे यांच्याकडे आज मराठी पत्रकार संघाचे भातकुली तालुका अध्यक्ष व सरपंच संघटनेचे प्रदेश मीडिया प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहे .त्याला त्याच्या या कार्यामुळे अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. "ज्याची लेखणी सामान्यांच्या डोळ्यांतील आसवे पुसण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चालते, तोच खरा आदर्श ग्रामीण पत्रकार होय. या दृष्टीने संतोष शेंडे हे आदर्श ग्रामीण पत्रकार आहेत या शंका नाही.त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचे अभिष्टचिंतन करतो.
शहरात नसलो आज जरी मी,
टाकरखेडा संभू ग्रामात आहे ॥
ग्रामातील पत्रकारितेचा मी,
गावकुसाचा श्वास आहे ॥
ग्रामनाथांच्या नयनातील
अश्रू पुसण्याचा ध्यास आहे ॥"
                  गावकुसाचा श्वास असलेल्या संतोष शेंडेला पुढील यशस्वी पत्रकारितेसाठी मनस्वी सदिच्छा ॥

       समता गौरव पुरस्कार प्राप्त
                    साहित्यिक
     प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
     अमरावती.८०८७७४८६०९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

API दिपक पाटील यांची यशोगाथा....