जो पर्यंत काड्या करणारे लोक आहेत, तो पर्यंत महाभारत थांबणार नाही…..!


जो पर्यंत काड्या करणारे लोक आहेत, तो पर्यंत महाभारत थांबणार नाही…..!

महाभारत एखाद्या ग्रंथापुरतं मर्यादित नाही. ते एका काळात घडलेलं युद्ध नसून, मानवी स्वभावात खोलवर रुजलेली एक शोकांतिका आहे. आज रणभूमी नाही, धनुष्यबाण नाहीत; पण तरीही युद्ध सुरूच आहे. कारण आजही आपल्या आजूबाजूला अशी माणसं आहेत, जी भांडण लावतात… आणि भांडण झाल्यावर ते कधीच मिटू नये यासाठी सतत काड्या करत राहतात.दोन माणसांमधील नातं म्हणजे काचेसारखं असतं.

नाजूक, पारदर्शक, आणि जपून हाताळावं लागणारं. पण काही लोक मुद्दाम त्या काचेला तडा जाईल अशी वाक्यं कानात घालतात. “तो तुझा अपमान करतोय”, “ती तुला कमी लेखतेय”, “गप्प बसलास तर तू हरशील” ही वाक्यं म्हणजे शब्दांत लपवलेली शस्त्रं असतात. स्वतः शांत राहून इतरांच्या नात्यांत वादळ निर्माण करणारी ही माणसं, नकळत का होईना, पण महाभारताची बीजं पेरत असतात.

खरं तर बहुतांश भांडणं गैरसमजातून होतात. थोडा संवाद, थोडं ऐकून घेणं, आणि थोडी माफी एवढ्याने अनेक नाती वाचू शकतात. पण जेव्हा मधे येऊन कोणी म्हणतं, “आता मागे हटू नकोस”, “माफी मागणं म्हणजे कमजोरी”, “याला धडा शिकवायलाच हवा” तेव्हा समेटाचा मार्ग बंद होतो आणि अहंकाराचं युद्ध सुरू होतं.
महाभारतात युद्ध टाळण्याच्या असंख्य संधी होत्या. पण चुकीचे सल्ले, हट्ट आणि सूडभावनेने सगळं नष्ट केलं. 

आजही तेच घडतंय. घराघरात भांडणं, भावंडांमधील दुरावे, मित्रांचे कायमचे विभक्त होणं आणि या सगळ्याच्या मागे बहुतेक वेळा असतात ते तिसरेच लोक, जे स्वतः कधीच पुढे येत नाहीत, पण आगीत तेल ओतत राहतात.

सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे, नातं तुटलं की हीच माणसं म्हणतात, “मी तर फक्त सत्य सांगितलं.” पण सत्य सांगणं आणि जखम खोल करणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो. खरं बोलणं माणसाला सावरायला मदत करतं, तर काड्या करणं माणसाला मोडून टाकतं.

जो पर्यंत आपण अशा लोकांची ओळख पटवत नाही, त्यांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या अनुभवांवर विश्वास ठेवत नाही, आणि संवादाचा मार्ग सोडत नाही. तो पर्यंत महाभारत घडतच राहणार. पात्रं बदलतील, परिस्थिती बदलेल, पण वेदना तशाच राहतील.

खरं युद्ध बाहेर नसतं, ते मनात असतं. अहंकाराशी, संशयाशी आणि विषारी सल्ल्यांशी. आणि जो माणूस हे युद्ध जिंकतो, तोच खरा विजेता असतो. कारण नातं वाचवणं हीच खरी वीरता आहे.

कदाचित आज वेळ आहे थांबून विचार करण्याची  कोणाच्या शब्दांमुळे आपण आपली माणसं गमावत तर नाही ना? कारण भांडण क्षणात होतं, पण त्यानंतरचं मौन आयुष्यभर जखम देत राहतं.आणि जोपर्यंत आपल्या आजूबाजूला शकुनी आहेत.तो पर्यंत महाभारत थांबणार नाही.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !