दिसायला ‘सुंदर’ असण्यापेक्षा, मन ‘स्वच्छ’ असणारी व्यक्ती शोधा…!
दिसायला ‘सुंदर’ असण्यापेक्षा, मन ‘स्वच्छ’ असणारी व्यक्ती शोधा…!
आजच्या जगात माणसाची किंमत त्याच्या चेहऱ्यावर, रंगावर, कपड्यांवर किंवा बाह्य आकर्षणावर ठरवली जाते. पहिल्या नजरेत भुरळ घालणारे सौंदर्य अनेकदा आपल्याला थांबवते, गुंतवते… पण प्रश्न असा आहे की, ते सौंदर्य किती काळ टिकते?
काळाच्या ओघात केस पांढरे होतात, चेहऱ्यावर सुरकुत्या उमटतात, डोळ्यांची चमक मंदावते. आरशात दिसणारे ते सौंदर्य हळूहळू कमी होते. पण मनाचं काय?
मन जर स्वच्छ असेल, तर ते वयासोबत अधिकच सुंदर होत जातं.
स्वच्छ मनाची व्यक्ती लहानसहान गोष्टींमध्ये आनंद शोधते. ती तुमच्या यशात आनंदी होते, तुमच्या दुःखात शांतपणे शेजारी बसते. तिला दिखावा माहीत नसतो, फक्त आपुलकी माहीत असते. अशा माणसाचं बोलणं जरी साधं असलं, तरी त्यात प्रामाणिकपणा असतो; वागणं जरी साधं असलं, तरी त्यात माणुसकी असते.
दिसायला सुंदर असणारी व्यक्ती तुम्हाला समाजात मिरवता येते,पण मनाने सुंदर असणारी व्यक्ती तुम्हाला आयुष्य जगायला शिकवते.
स्वच्छ मनाची माणसं फार मोठी आश्वासनं देत नाहीत, पण दिलेला शब्द पाळतात. ती ओरडून प्रेम दाखवत नाहीत, पण शांतपणे आयुष्यभर साथ देतात. वाद झाल्यावर जिंकण्याचा हट्ट करत नाहीत,नातं वाचवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांच्यासाठी ‘मी’पेक्षा ‘आपण’ महत्त्वाचं असतं.
खरं तर आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला सुंदर चेहरा आठवत नाही,आठवतो तो अडचणीत हात घट्ट धरून ठेवणारा माणूस,डोळ्यांत पाणी असताना हसवणारा आवाज,आणि कोणती ही अपेक्षा न ठेवता सोबत करणारे मन.
म्हणूनच, आयुष्यात जोडीदार, मित्र किंवा माणसं निवडताना फक्त डोळ्यांनी पाहू नका…मनाने ओळखा.
कारण सौंदर्य काही वर्षांत संपेल,पण स्वभाव…स्वभाव आयुष्यभर साथ देतो.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा