जेव्हा घराचे सूत्र परक्यांच्या हातात जातात...!



जेव्हा घराचे सूत्र परक्यांच्या हातात जातात...!

घर… हा शब्द उच्चारताच मनात एक उबदारपणा दाटून येतो. आईच्या मायेचा स्पर्श, वडिलांच्या छायेसारखा आधार, भावंडांच्या खट्याळ हसण्याचा गोंगाट हे सगळं मिळूनच घर तयार होतं. घर म्हणजे फक्त विटा आणि सिमेंट नव्हे, तर ते असतं जिव्हाळ्याच्या नात्यांचं, विश्वासाचं आणि प्रेमाचं एक जिवंत जग.

पण कधी कधी आयुष्याच्या वळणावर अशी वेळ येते, की घराचे सूत्र हळूहळू आपल्या हातातून निसटून परक्यांच्या हातात जाऊ लागतात… आणि तेव्हा घर तसंच राहून ही काहीतरी हरवल्यासारखं वाटू लागतं.

पूर्वी घरात घेतले जाणारे निर्णय आपल्या माणसांच्या सल्ल्याने, त्यांच्या भावनांचा विचार करून घेतले जायचे. प्रत्येक गोष्टीत आपुलकी होती, एकमेकांची काळजी होती. पण जेव्हा परके लोक घराच्या निर्णयांमध्ये येऊ लागतात, तेव्हा त्या निर्णयांमध्ये व्यवहार असतो, पण भावना नसतात.

घरात आपलीच माणसं असूनही आपण एकटे वाटू लागतो. आपल्या मताला किंमत राहत नाही, आपली उपस्थिती जणू गौण ठरते. हळूहळू घरातील आपलेपण विरघळत जाते आणि त्या जागी एक अनोळखी शांतता पसरते.

परके लोक घर व्यवस्थित सांभाळतील ही कदाचित नियम, शिस्त, व्यवस्था सगळं सुरळीत ठेवतील. पण ते त्या घरातल्या आठवणी समजू शकतील का? त्या भिंतींवर कोरलेली भावनांची कहाणी वाचू शकतील का? प्रत्येक कोपऱ्यात दडलेली आपल्या लोकांची चाहूल त्यांना जाणवेल का?

घर चालवणं आणि घर जगवणं यात फरक असतो. घर चालवण्यासाठी फक्त हात लागतात,पण घर जगवण्यासाठी हृदय लागतं.

जेव्हा घराचे सूत्र परक्यांच्या हातात जातात, तेव्हा नात्यांची वीण सैल होऊ लागते. संवाद हरवतो, गैरसमज वाढतात आणि एकेकाळी जिवाभावाचे असलेले लोकही दूर जातात. घरात राहूनही ‘आपलं’ असं काही उरत नाही.हीच त्या वेदनेची खरी तीव्रता असते.

त्या क्षणी मनात एक वेदनादायी प्रश्न घुमत राहतो.
"आपण घर गमावलं आहे का, की घराने आपल्याला?"

घर वाचवायचं असेल, तर नाती जपावी लागतात. विश्वास टिकवावा लागतो. कारण घर हे केवळ वास्तू नसतं ते असतं मनांचं नातं. आणि हे नातं एकदा तुटलं, की पुन्हा जोडणं फार कठीण असतं.

म्हणूनच, घराचे सूत्र आपल्या माणसांच्या हातातच राहू द्या… कारण परके लोक घर सांभाळू शकतात, पण घराला “घरपण” देऊ शकत नाहीत.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !