दिलदार मनाचा दिलदार माणूस: महेश लक्ष्मण पाटील



दिलदार मनाचा दिलदार माणूस: महेश लक्ष्मण पाटील

गंगापुरी... धरणगाव तालुक्यातलं एक छोटंसं गाव. साधं, शांत आणि निरागसपणात न्हालेलं. या गावात जन्मलेल्या महेश लक्ष्मण पाटील यांचं जीवन ही या गावासारखंच साधं, पण माणुसकीच्या सुगंधानं भरलेलं. साध्या कुटुंबात जन्मलेले महेश पाटील... त्यांच्या वडिलांनी शेतात कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मातीशी नातं घट्ट असलेल्या या घरात जन्मलेल्या या पोरानं एक दिवस गावाचा सरपंच होईल, असं कुणाच्या स्वप्नात ही नव्हतं. पण बालपणापासूनच समाजासाठी काही तरी करण्याची ज्योत त्यांच्या मनात तेवत होती.

महेश पाटील यांचं जीवन म्हणजे साधेपणाची शिकवण. त्यांनी कधी ही दिखावा केला नाही, पदासाठी लोभ धरला नाही, किंवा स्वार्थासाठी कोणता ही अनुचित मार्ग पत्करला नाही. त्यांच्या सच्चेपणाने आणि निःस्वार्थ वृत्तीनेच ते दोन वेळा गंगापुरीचे सरपंच बनले आणि आजही विद्यमान सरपंच म्हणून गावाची सेवा करत आहेत. त्यांच्या कारभारात पारदर्शकता आहे, जनतेच्या हितासाठी तत्परता आहे आणि त्यांच्या निर्णयांमध्ये स्वार्थाचा लवलेशही नाही.

महेश पाटील यांची दिलदारी म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं सौंदर्य. गरजूंना मदत करणं, कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांसाठी झटणं – ही त्यांची वृत्ती सर्वांना आपलीशी वाटते. त्यांच्या दारात आलेला कोणीही रिकाम्या हाती परत जात नाही. त्यांनी दिलेल्या शब्दाला तोल असतो आणि त्यांच्या मदतीला मनाची उदारता असते. त्यांच्या दिलदार स्वभावामुळेच ते ‘दिलदार मनाचा दिलदार माणूस’ म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणात समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड दिसते. गावात पाणीपुरवठ्याची अडचण असो की रस्त्यांची दुरुस्ती, महेश पाटील यांचं पाऊल नेहमीच पुढे असतं. त्यांनी विकासकामांसाठी निधी मिळवला, गावातील लोकांना एकत्र आणलं आणि सामूहिक प्रयत्नांनी गंगापुरीचं चित्र पालटलं. त्यांच्या नेतृत्वाखाली गावाने प्रगतीची वाट धरली आणि जनतेच्या मनात त्यांच्या कामाची पक्की छाप पडली.

महेश पाटील यांची खासियत म्हणजे त्यांच्या मनाची कोमलता. कोणाचं दुःख पाहिलं की त्यांची काळजी वाहणारी मनाची ओल मनाला स्पर्शून जाते. त्यांचं हसत मुख आणि दिलदार बोलणं ऐकणारं प्रत्येक मन आपसूकच जिंकून घेतं. त्यांनी केवळ विकासकामेच नाहीत, तर माणुसकीची नातीही जपली. त्यांच्या साधेपणात माणुसकीची श्रीमंती दडलेली आहे.

आज महेश पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या या खास दिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची, त्यागाची आणि माणुसकीच्या सेवेची आठवण मनाला नकळत हुरहुर लावून जाते. त्यांचं दिलदार मन, सच्चा स्वभाव आणि समाजासाठीची निःस्वार्थ भावना अशीच अखंड राहो, त्यांच्या नेतृत्वाखाली गंगापुरी गाव सतत प्रगतीपथावर वाटचाल करो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, महेश पाटील सर!
आपल्या दिलदार मनाचा सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहो आणि आपल्या कार्याचा प्रकाश समाजात नवी उमेद निर्माण करो!

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !