स्वप्नांचे वटवृक्ष : अनिल अंबुलाल महाजन यांची संघर्षगाथा


स्वप्नांचे वटवृक्ष : अनिल अंबुलाल महाजन यांची संघर्षगाथा

धानोरा, तालुका चोपडा या लहानशा गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले अनिल अंबुलाल महाजन यांचे आयुष्य म्हणजे जिद्द, कष्ट आणि स्वप्नांची संघर्षमय कहाणी आहे. वडील रेल्वे सेवेत कार्यरत होते आणि सोबतच दुधाचा व्यवसाय ही करत होते. घरात काटकसरीचं वातावरण होतं, पण स्वप्नं मात्र आभाळा एवढी मोठी होती.

चोपडा येथे शिक्षण घेत असताना अनिलजींच्या मनात नेहमीच एक वेगळी उमेद धगधगत होती — "आपण काही तरी वेगळं करायचं." या स्वप्नाने त्यांना कधी ही स्वस्थ बसू दिलं नाही. लहानपणापासूनच त्यांनी स्वबळावर काही तरी मोठं घडवायचं ठरवलं होतं.

भुसावळच्या गजबजलेल्या वातावरणात त्यांनी आयुष्याचं एक छोटंसं रोप लावलं — "सदगुरु आयुर्वेदिक डिस्ट्रीब्यूटर" या नावाने आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला वाटलं ही नसेल की हे छोटेसे रोप एक दिवस वटवृक्ष बनेल. पण त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांनी, मेहनतीने आणि लोकसेवेच्या भावना ठेवून त्या रोपट्याने मजबुतीने मुळे धरली.
आज "सदगुरु" हा ब्रँड संपूर्ण जिल्ह्यात आयुर्वेदिक औषधांचा विश्वासार्ह आणि प्रिय वितरक म्हणून ओळखला जातो.

अनिलजींची खासियत म्हणजे त्यांचं साधेपण आणि माणूस जोडण्याची असामान्य कला. ते केवळ व्यवसाय करत नाहीत, तर प्रत्येकाशी नातं जपतात — मग ते ग्राहक असो, कर्मचारी असो किंवा व्यावसायिक सहकारी असो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कुठला ही अहंकार नाही; उलट मदतीचा हात पुढे करणारी, सर्वांना बरोबर घेऊन चालणारी सहज वृत्ती आहे.

आज ही अनिल महाजन यांचा प्रवास अखंड सुरू आहे. वडिलांनी दिलेल्या संस्कारांचे रोप त्यांनी आज ही काळजी पूर्वक जपले आहे. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे, त्यांच्या चिरंजीव सौरव आणि ऋषभ महाजन यांनी ही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत "सदगुरु" या वटवृक्षाच्या फांद्या अधिक मजबूत करण्याचं काम सुरू केलं आहे.

सौरव आणि ऋषभ, दोघे ही नव्या काळाची ऊर्जा, नव्या दृष्टीकोनासह व्यवसायात उतरले आहेत. त्यांनी वडिलांकडून मिळवलेली प्रामाणिकतेची शिकवण, परिश्रमाची सवय आणि माणूस जोडण्याची कला आपल्या प्रत्येक व्यवहारात प्रकट केली आहे.
त्यांच्या आगमनाने "सदगुरु" या नावाला नवसंजीवनी मिळाली आहे.

"साधेपणाने जगायला शिकवणारी माणसं फार थोडी असतात," हे वाक्य अनिल अंबुलाल महाजन यांच्या व्यक्तिमत्त्वावर अक्षरशः लागू होतं. त्यांच्या यशस्वी प्रवासाने एक अनमोल धडा शिकवला — स्वप्नं मोठी असली पाहिजेत, पण ती जमिनीत खोल रुजलेली असली पाहिजेत.

आज भुसावळ आणि संपूर्ण जिल्ह्यात "सदगुरु" या नावाचा उच्चार आदराने होतो. लोक केवळ त्यांच्या औषधांवर नव्हे, तर त्यांच्या शब्दावर ही नितांत विश्वास ठेवतात. कारण त्यांनी व्यवसायाकडे केवळ नफा म्हणून नाही, तर लोकसेवेचं साधन म्हणून पाहिलं आहे.

वडिलांची शिकवण, स्वतःची प्रामाणिक मेहनत आणि मुलांची साथ यावर उभा राहिलेला हा "सदगुरु" वटवृक्ष केवळ अनिलजींचाच नाही, तर हजारो लोकांच्या श्रद्धेचा आधार बनला आहे.
पुढील काळात सौरव आणि ऋषभ यांच्या रुपाने हे वटवृक्ष अजून अधिक विस्तारेल, फळं फळेल, याबद्दल शंका नाही.

एक छोटं रोप लावलं, आणि आज ते लाखोंच्या आशीर्वादाने बहरतंय — हीच अनिल महाजन यांच्या यशोगाथेची खरी ओळख आहे.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !