प्रवक्ता ॲकडमी एका स्वप्नाचा साकार होणारा भावनिक प्रवास....!

प्रवक्ता ॲकडमी एका स्वप्नाचा साकार होणारा भावनिक प्रवास....!

एरंडोल – शहरासह संपूर्ण तालुक्यात शिक्षण क्षेत्रातील आपली ठसठशीत ओळख निर्माण करणाऱ्या प्रवक्ता ॲकडमीच्या AI लॅबचे उद्घाटन आणि इंग्लिश स्पीकिंग स्पर्धेतील बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. अमितदादा पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक डॉ. सुरेशजी पाटील, शेखर पाटील सर आणि शिवसेना शहर संघटक मयुरभाऊ महाजन यांनी आपली उपस्थिती दर्शवली. याशिवाय प्रवक्ता ॲकडमीचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम म्हणजे केवळ एका लॅबचं उद्घाटन नव्हतं, तर तो होता एका माणसाच्या जिद्दीचा, अथक परिश्रमांचा आणि शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्याच्या ध्यासाचा साक्षीदार असलेला क्षण. डॉ. विजय पाटीलसरांनी आजपासून नव्हे, तर अनेक वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं  शिक्षण हे फक्त श्रीमंतांचं नव्हे, तर सर्वसामान्य गोर-गरीब मुलांचं ही हक्काचं असावं.

या स्वप्नाची सुरुवात झाली ती रामचंद्र नगर, एरंडोल येथील एका छोट्याशा संगणक सेंटरमधून. त्या काळात संसाधनं कमी होती, पण आत्मविश्वास प्रचंड होता. तेव्हा संगणक शिक्षण म्हणजे एक अनोखा विषय होता, आणि त्यातूनच त्यांनी आपल्या ध्येयाचा आरंभ केला.

सुरुवातीचे दिवस संघर्षाचे होते. कधी आर्थिक अडचणी, कधी सामाजिक आव्हानं, पण तरीही डॉ. विजय पाटील सरांनी हार मानली नाही. त्यांनी त्या प्रत्येक अडथळ्याला संधी मानत प्रवास सुरू ठेवला. आणि आज त्याच प्रवासाचा एक ऐतिहासिक टप्पा प्रवक्ता ॲकडमीच्या AI लॅबच्या रूपाने गाठण्यात आला आहे.

आज ही ॲकडमी आधुनिक शिक्षणपद्धती, तंत्रज्ञानाचा उपयोग, आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी समर्पित झाली आहे. इंग्लिश स्पीकिंग स्पर्धा हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. केवळ गुणांकनासाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य विकसित करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं, आणि त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना यथोचित गौरव ही करण्यात आला.

या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित मा. अमितदादा पाटील यांनी ॲकडमीच्या कार्याचं कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. सुरेशजी पाटील माजी नगरसेवक, शेखर पाटील सर, आणि मयुरभाऊ महाजन यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या प्रयत्नांचं महत्त्व पटवून दिलं.

या संस्थेच्या यशामागे फक्त एक नाव नाही, तर एक टीम आहे. प्रवक्ता ॲकडमीचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांची मेहनत. पण हे स्वप्न साकार झालं ते डॉ. विजय पाटीलसरांच्या
दूरदृष्टीमुळे, न थांबणाऱ्या प्रयत्नांमुळे आणि शिक्षणाबद्दल असलेल्या निस्सीम प्रेमामुळे.

आज या AI लॅबच्या उद्घाटनाने प्रवक्ता ॲकडमीने एक नवा अध्याय सुरू केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या आधुनिक विषयांमध्ये शिकण्याची संधी निर्माण झाली आहे. हे खरं तर क्रांतिकारी पाऊल आहे.

या प्रेरणादायी प्रवासाच्या साक्षीदार होण्याचा अभिमान संपूर्ण एरंडोल शहराला आहे. आणि म्हणूनच डॉ. विजय पाटीलसरांचे हे कार्य केवळ अभिनंदनीय नाही, तर संपूर्ण शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे आहे.

तुमच्या या कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!एक शिक्षक म्हणून नाही, तर समाजघटक म्हणून उभारलेली ही शैक्षणिक चळवळ सदैव प्रेरणादायी ठरेल.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !