टीकेच्या आगीत घडलेली ओळख....!


टीकेच्या आगीत घडलेली ओळख....!

आजच्या काळात शांत राहणं सोपं आहे, पण ठाम उभं राहणं फार अवघड झालं आहे. कारण जो उभा राहतो, तोच दिसतो… आणि जो दिसतो, त्याच्यावरच बोटं दाखवली जातात. लोक येतात, नावं ठेवतात, टीका करतात, हेतूंवर शंका घेतात. हे सगळं अपरिहार्य आहे. कारण शांत उभा असलेल्याला कुणी दगड मारत नाही; दगड नेहमी चालणाऱ्यालाच लागतात.

जिथे हालचाल असते, जिथे बदलाची चाहूल लागते, तिथेच विरोध जन्म घेतो. आज समाजात अनेकजण बदलाची भाषा करतात, पण प्रत्यक्षात बदल घडवणाऱ्यालाच विरोध करतात. कारण बदल अस्वस्थ करतो, प्रश्न विचारायला लावतो, आणि माणसाला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. म्हणूनच विरोध हा प्रगतीचा शत्रू नसून, तो तिचा पहिला टप्पा असतो.

हिंमत नसेल तर प्रतिष्ठा उभी राहत नाही. स्वतःसाठी उभं राहण्याचं धाडस ज्याच्यात असतं, त्यालाच खरी ओळख मिळते. बाकी सगळे गर्दीत हरवून जातात.आज स्वतःच्या मतांवर ठाम राहणं म्हणजे बंडखोरी समजली जाते. पण लक्षात ठेवा, इतिहास घडवणारे लोक कधीच सगळ्यांना आवडले नाहीत.

टीका ही अपयशाची नाही, तर प्रयत्नांची पावती असते. तुम्ही काहीतरी करत आहात, म्हणूनच लोक बोलत आहेत. जर कोणीच विरोध करत नसेल, तर कदाचित तुम्ही सुरक्षित वाटेवर चालत असाल; पण योग्य दिशेने चालत आहात की नाही, याची खात्री मिळत नाही. विरोधक असणं म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात याचं लक्षण असतं.

प्रत्येक विरोध तुमची ताकद तपासतो. प्रत्येक नाव ठेवणारा तुम्हाला अधिक कणखर बनवतो. सुरुवातीला दुखतं, मन खचतं, कधी कधी वाटतं “हे सगळं कशासाठी?” पण काळ जसजसा पुढे जातो, तसतसं लक्षात येतं की याच विरोधाने तुमचं व्यक्तिमत्त्व घडवलं, तुम्हाला खंबीर बनवलं.

सगळ्यांना खूश ठेवण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. कारण सगळ्यांची मर्जी राखताना शेवटी स्वतःचं अस्तित्व पुसट होत जातं.स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या विचारांवर ठाम रहा आणि वाटचाल थांबवू नका. लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःला काय वाटतं, हे महत्त्वाचं आहे.

आजची परिस्थिती कठीण आहे, पण अशाच काळात खऱ्या नेतृत्वाची, खऱ्या हिंमतीची ओळख होते. कारण हिंमत असेल तरच प्रतिष्ठा टिकते…आणि विरोध असेल तरच खरी प्रगती होते.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !