अहंकाराच्या सावलीत तुटत जाणारी नाती....!
अहंकाराच्या सावलीत तुटत जाणारी नाती....!
असतात काही अशी माणसं जी स्वतःच्या धुंदीत इतकी हरवलेली असतात की त्यांच्या वागण्याने समोरच्याच्या मनात काय वादळ उठलं आहे, याची त्यांना साधी जाणीवही नसते. त्यांना वाटतं की त्यांनी बोललेले शब्द हे फक्त शब्दच असतात; पण समोरच्यासाठी ते शब्द आयुष्यभर न भरून येणाऱ्या जखमा ठरतात. काही जखमा रक्त न सांडता खोलवर रुजतात, आणि अशाच जखमा या माणसांकडून नकळत दिल्या जातात.
अशी माणसं स्वतःला नेहमीच बरोबर समजतात. चूक झाली तरी ती आपली असू शकते, हा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. माफी मागणं त्यांना कमीपणाचं वाटतं, आणि जबाबदारी स्वीकारणं म्हणजे अहंकारावर घाव बसणं. त्यामुळे ते सहजपणे दोष दुसऱ्याच्या खांद्यावर टाकून मोकळे होतात. आपण समोरच्याला दुखावलं, अपमानित केलं, असं मान्य करणं त्यांना जमतच नाही.
नात्यांमध्ये संवादापेक्षा समजून घेणं अधिक महत्त्वाचं असतं. पण अशा लोकांसाठी नातं हे जपण्यासारखं नसून जिंकण्याचं मैदान असतं. कोण बरोबर, कोण चूक याच गणितात ते अडकलेले असतात. समोरच्याच्या भावनांना किंमत न देता ते स्वतःच्या अहंकाराभोवती भिंती उभ्या करतात. त्या भिंती इतक्या उंच असतात की प्रेम, आपुलकी, विश्वास यांना आत शिरायलाच जागा उरत नाही.
सतत दोषारोप, टोमणे, दुर्लक्ष आणि भावनिक दुरावा.या सगळ्यामुळे नात्यांमधला विश्वास हळूहळू गळून पडतो. एकेकाळी आपुलकीने भरलेली नाती ओस पडतात. जिथे प्रेम असायला हवं, तिथे भीती राहते. जिथे संवाद हवा, तिथे शांतता दाटून येते. आणि जिथे आपलेपणा असायला हवा, तिथे फक्त स्वार्थ उरतो.
कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो.समजावून सांगण्याचा, समजून घेण्याचा, नातं वाचवण्याचा. पण जेव्हा समोरची व्यक्ती स्वतःकडे पाहण्याची हिंमतच करत नाही, तेव्हा आपले सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात. स्वतःच्या चुका मान्य न करणारी माणसं कधीच बदलत नाहीत, आणि अशा माणसांसोबत राहून आपण हळूहळू स्वतःलाच हरवतो.
म्हणूनच काही वेळा अंतर ठेवणं हे स्वार्थीपणाचं नसून आत्मसंरक्षणाचं असतं. मनःशांती ही कोणत्याही नात्यापेक्षा मौल्यवान असते. स्वतःच्या भावनांचा आदर करणं, स्वतःला जपणं हेही तितकंच गरजेचं आहे. कारण जिथे समज, आदर आणि प्रेम नाही.तिथे नातं नावापुरतंच उरतं, आणि आत्मा मात्र रोज थोडा थोडा तुटत जातो.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा