विचार इतकाच करावा की ज्याने…..!


विचार इतकाच करावा की ज्याने…..!

विचार इतकाच करावा की ज्याने मार्ग सापडेल, इतका नाही की आयुष्याचाच वेग हरवेल. कारण विचार हा आयुष्याचा सोबती आहे, मालक नाही. तो हातात हात घालून चालायला हवा, पायात बेड्या घालण्यासाठी नाही. विचारांनी दिशा मिळते, पण अति विचारांनी दिशाच हरवते.

विचार माणसाला सजग करतो, शहाणा बनवतो. पण तोच विचार जेव्हा मनात घर करून बसतो, तेव्हा तो भीतीचं रूप घेतो. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण हवी, प्रत्येक निर्णय चुकू नये, प्रत्येक पाऊल सुरक्षित असावं.या अपेक्षांमध्ये माणूस इतका अडकतो की पुढे जायची हिंमतच हरवून बसतो. मग मन प्रश्नांनी भरतं, पण उत्तरं मात्र दूरच राहतात.

प्रत्येक गोष्टीचा खोल विचार करत बसलो तर पाऊल उचलण्याआधीच आयुष्य पुढे निघून जातं. काही निर्णय डोक्याने नाही तर वेळेने घ्यावे लागतात. कारण आयुष्य हे गणित नाही की प्रत्येक उदाहरण आधीच सोडवून ठेवता येईल. इथे अनेकदा उत्तर शोधायचं नसतं, तर उत्तर अनुभवत घडवायचं असतं.

चालता चालता चुका होतात, कधी वाट चुकते, कधी मन दुखतं. पण त्या प्रत्येक चुकांमधून अनुभव जन्माला येतो. जो अनुभव पुस्तकांत नाही, तो आयुष्य शिकवतं. अति विचार केल्याने मात्र भीती वाढते.अपयशाची, लोकांच्या मतांची, स्वतःच्या अपेक्षांची. आणि ही भीती संधींच्या वाटेत उभी राहते. संधी येते, पण आपण मागे सरतो.

मन शांत असेल तर साधा विचारही योग्य ठरतो. शांत मन वर्तमानात जगतं. पण सतत भूतकाळ कुरतडणं आणि भविष्याची चिंता करणं आपल्याकडचा वर्तमान चोरून नेतं. जे झालं ते बदलता येत नाही आणि जे होणार आहे ते पूर्णपणे आपल्या हातात नसतं. पण जो क्षण समोर उभा आहे, तो मात्र आपल्या कृतीची वाट पाहत असतो.

विचार उपयोगी तेव्हाच ठरतात जेव्हा ते कृतीकडे नेतात. जे विचार आपल्याला थांबवतात, आत्मविश्वास कमी करतात, मनावर ओझं टाकतात.ते सोडून देणं गरजेचं असतं. आणि जे विचार आपल्याला पुढे जाण्याचं बळ देतात, चुका स्वीकारायला शिकवतात, पुन्हा उभं राहायला प्रेरणा देतात.तेच विचार स्वीकारायला हवेत.

कारण आयुष्य वेगाने जगणं महत्त्वाचं नाही, तर योग्य दिशेने जगणं महत्त्वाचं असतं. थोडा विचार करा, पण मन मोकळं ठेवा. धाडस ठेवा, प्रयत्न करा, आणि पुढे चालत राहा. कारण आयुष्य विचारांवर थांबत नाही, ते कृतीतूनच फुलतं.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या