नम्रतेमधल मोठेपण....!

नम्रतेमधल मोठेपण....!

आदराणे दिलेला एक नमस्कार हा केवळ शिष्टाचार नाही, तर तो माणसाच्या अंतर्मनातून उमटलेला संस्कारांचा स्वर असतो. दोन हात जोडताना फक्त बोटं एकत्र येत नाहीत, तर त्यामागे असलेली नम्रता, आदर आणि माणुसकीही एकत्र येते. शब्द न उच्चारता दिलेला हा नमस्कार समोरच्याच्या मनात थेट पोहोचतो आणि क्षणात नात्याला एक उबदार स्पर्श देऊन जातो.

नमस्कार करताना माणूस थोडा वाकतो, पण त्यात कुठे ही कमीपणा नसतो. उलट, त्या वाकण्यात अहंकार आपोआप झुकतो आणि माणुसकी ताठ उभी राहते. “मी”पण विरघळून “आपण”पण जन्माला येतो. मोठेपणा हा पदात, पैशात किंवा अधिकारात नसून तो नम्रतेत असतो, हे एक साधा नमस्कार नकळत शिकवून जातो.

आदराने वाकलेलं मस्तक कधीच लहान ठरत नाही. तेच मस्तक समोरच्याच्या मनात सन्मानाचं स्थान मिळवतं. नमस्कार देणारा माणूस स्वतःची ओळख शब्दांत सांगत नाही, पण त्याचे संस्कार, त्याची जडणघडण आणि त्याची संस्कृती त्या एका कृतीतून स्पष्ट दिसून येते. म्हणूनच नमस्कार हा केवळ कृती नसून तो व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो.

समाजात नाती टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते; कधी कधी एक छोटासा नमस्कार पुरेसा ठरतो. तो दुरावा कमी करतो, गैरसमज दूर करतो आणि संवादाची दारं उघडतो. राग, तणाव आणि व्यस्ततेच्या गर्दीत हरवलेली माणुसकी एका नमस्कारातून पुन्हा जागी होते.

आजच्या धावपळीच्या, मोबाईलमध्ये अडकलेल्या जगात हा साधा, पण अर्थपूर्ण नमस्कार दुर्मिळ होत चालला आहे. तरीही जिथे अजून नमस्कार जिवंत आहेत, जिथे आदराने माणसं एकमेकांकडे पाहतात, तिथे आपली संस्कृती अजून श्वास घेत आहे. कारण संस्कृती मोठ्या भाषणांत नाही, तर रोजच्या अशा छोट्या, पण मनाला भिडणाऱ्या कृतींत जिवंत असते.

आदराणे दिलेला एक नमस्कार…तो फक्त हात जोडत नाही,तो मन जोडतो, माणसं जोडतो आणि माणुसकीला पुन्हा पुन्हा जिवंत ठेवतो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

API दिपक पाटील यांची यशोगाथा....

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

संतोष शेंडे एक आदर्श ग्रामीण पत्रकार