आयुष्यात पैसा कमवा पण…..!
आयुष्यात पैसा कमवा पण…..!
आयुष्यात पैसा कमवणं आवश्यक आहे. कारण पैसा म्हणजे फक्त सुखसोयी नाहीत, तर आत्मसन्मान, स्वप्नांना बळ आणि जबाबदाऱ्यांची खात्री असते. पण तो कुठून येतो, किती येतो, कसा येतो.हे सगळं प्रत्येकाला सांगत फिरणं शहाणपणाचं नसतं. कारण पैशाबरोबर माणसांच्या नजरा बदलतात, आणि त्या बदललेल्या नजरांमध्ये माणूस हरवू लागतो.
आज तुमचे कष्ट लोकांना दिसतात. तुमचा संघर्ष, तुमची धडपड, तुमचं न थकणं सगळं कौतुकास्पद वाटतं. पण उद्या जेव्हा यश तुमच्या दाराशी येतं, तेव्हा तेच कष्ट संशयास्पद वाटू लागतात. “इतकं कसं?” “एवढ्या लवकर कसं?” असे प्रश्न मनात जन्म घेतात. यश दिसू लागतं, पण त्या मागचा संघर्ष अदृश्य होतो.
कमाईची माहिती झाली की आपुलकी हळूहळू कमी होते आणि सल्ले वाढू लागतात. कोण कसा खर्च करावा, कुणाला मदत करावी, कुठे गुंतवणूक करावी.हे सगळं सांगणारे अचानक वाढतात. पण या सल्ल्यांमागे काळजीपेक्षा तुलना जास्त असते. काही जण खरोखर प्रेरणा घेतात, पण बरेच जण स्पर्धा आणि हेवा मनात साठवून ठेवतात. तुमचं यश त्यांच्या अस्वस्थतेचं कारण ठरतं.
पैशाची गोष्ट उघड झाली की नात्यांत हिशेब शिरतो. मदत मागणं प्रेमाने नाही, तर हक्काने केलं जातं. आणि जेव्हा तुम्ही “नाही” म्हणता, तेव्हा तुमचा स्वभाव मोजला जातो. तुम्ही किती दिलंत यावर नव्हे,तर किती नाकारलंत यावर तुमचं माणूसपण ठरवलं जातं. नाती अपेक्षांच्या ओझ्याखाली दबली जातात.
शांतपणे कमावलेला पैसा मनाला सुरक्षितता देतो. तो गोंगाट करत नाही, पण आयुष्य स्थिर करतो.तो अहंकार वाढवत नाही, तर नम्रता शिकवतो.उलट गाजवलेली कमाई माणसाला स्वतःपासून दूर नेत जाते. गर्व वाढतो, अपेक्षा वाढतात,आणि संकटं आपोआप दार ठोठावतात.नजरांच्या रूपात, शब्दांच्या रूपात, नात्यांच्या रूपात.
म्हणून यश मिळालं तरी ते दाखवण्यात आनंद मानू नका. शहाणपण जपा. तुमचं यश तुमच्या शांततेत, तुमच्या आत्मविश्वासात आणि तुमच्या समाधानात दिसू द्या. पैसा तुमच्यासाठी काम करू द्या.तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी,आणि तुमच्या मनाच्या शांततेसाठी. तुम्ही पैशासाठी काम करत राहिलात, तर आयुष्यभर धावपळच उरेल.
खरी श्रीमंती म्हणजे मोठं घर, महागडी गाडी किंवा गाजलेलं यश नाही. खरी श्रीमंती म्हणजे शांत झोप, न तुटलेली नाती आणि स्वतःशी प्रामाणिक असलेलं आयुष्य. आणि ही श्रीमंती जपायची असेल, तर पैसा कमवा… पण तो गुपितात ठेवा.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा