स्वार्थाच्या जगात निस्वार्थ मनं....!
स्वार्थाच्या जगात निस्वार्थ मनं....!
या जगात खूप माणसं अशी असतात की ज्यांचा स्वभाव कधीच कामापुरता नसतो. ते नात्यांकडे व्यवहार म्हणून पाहत नाहीत. भेटले की हसून भेटणं, मदत करताना मनापासून करणं आणि नातं जोडताना “मला काय मिळेल?” असा हिशोब न ठेवणं ही त्यांच्या स्वभावाची ओळख असते. त्यांची आपुलकी वेळेवर अवलंबून नसते किंवा गरजेपुरती मर्यादित नसते. म्हणूनच अशा माणसांना आयुष्यात थोडं अधिक दुखावलं जातं, थोडं अधिक फसवलं जातं; तरीसुद्धा ते पुन्हा माणसांवर विश्वास ठेवतात. कारण त्यांचा स्वभाव व्यवहाराचा नसून माणुसकीचा असतो.
अशा लोकांना अनेकदा “तू खूप चांगला आहेस” असं म्हणत लोक बाजूला होतात. सुरुवातीला गोड बोलणं, जवळ येणं आणि आपुलकी दाखवणं हे सगळं असतं; पण काम झालं की माणसं बदलतात. हे अनुभव मनाला थकवणारे आणि वेदनादायक असतात. मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की ही फसवणूक त्यांच्या चांगुलपणाची हार नसते, तर त्यांच्या समजुतीची सुरुवात असते. या अनुभवांतूनच माणसं ओळखण्याची दृष्टी अधिक स्पष्ट होत जाते.
नाती टिकवण्यासाठी हे लोक जे प्रयत्न करतात, ते कुठल्याही प्रकारच्या कमजोरीतून नसतात. ते त्यांच्या आतल्या समृद्ध मनातून येतात. आजच्या काळात स्वार्थाशिवाय कुणासाठी उभं राहणं, अपेक्षेशिवाय प्रेम करणं आणि अटींशिवाय साथ देणं हे खरं तर धैर्याचं काम आहे. प्रत्येकाला हे जमेलच असं नाही आणि म्हणूनच सगळे माणसं तसे नसतात. तरीही जे माणसं असे प्रयत्न करतात, ती मनाने खूप मोठी असतात.
“लोक गोड बोलतात” हा अनुभव जेव्हा वारंवार येतो, तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की सगळेच लोक वाईट असतात. त्याचा अर्थ इतकाच असतो की आपली नजर बदलत चालली आहे. माणसं ओळखण्याची समज वाढत आहे. प्रत्येक अनुभव विश्वास मोडण्यासाठी येत नाही, तर तो विश्वास कुठे ठेवायचा,कुणासाठी उघडायचा आणि कुठे थांबायचं हे शिकवण्यासाठी येतो.
हे खरं आहे की लोक बदलतील, गरजेनुसार वागतील आणि कधी कधी स्वार्थीही होतील. पण त्यांच्या वागण्यामुळे आपण आपला स्वभाव बदलू नये. आपलं हृदय कठोर करू नये. मात्र थोडी शहाणपणाची सीमा आखणं आवश्यक आहे. प्रत्येकासाठी सगळं होण्याची गरज नसते आणि प्रत्येकाला सगळं देण्याची जबाबदारीही आपली नसते.
स्वतःच्या वेळेची किंमत ओळखणं, भावनांची जपणूक करणं आणि मनाच्या शांततेला प्राधान्य देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण सगळ्यांसाठी सगळं होण्यापेक्षा योग्य माणसासाठी स्वतःसारखं राहणं हीच खरी श्रीमंती आहे. आणि ज्यांचा स्वभाव कधीच कामापुरता नसतो, ती माणसं मनानं आधीच श्रीमंत असतात; फक्त कधी कधी त्यांना ते ओळखायला थोडा वेळ लागतो.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा