अनुभवातून शहाणपण....!


अनुभवातून शहाणपण....!

“अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे” हे वाक्य आपण वारंवार उच्चारतो; पण त्यामागचा अर्थ मात्र अनेकदा आपल्या मनापर्यंत पोहोचत नाही. कारण अनुभव शिकवतो असं आपण मान्य करतो, पण तो अनुभव स्वतःचा नसेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहण्याची सवय आपल्यात कमीच असते. दुसऱ्याच्या आयुष्यात घडलेली घटना आपल्याला फक्त ऐकलेली गोष्ट वाटते, जोपर्यंत तिची झळ स्वतःला लागत नाही.

समाज हा खरं तर आपल्याला सतत आरसा दाखवत असतो. पण त्या आरशात पाहताना आपण स्वतःला शोधत नाही; उलट इतरांच्या चुका, उणिवा, अपयश यातच आपलं लक्ष अडकतं. कुणी चुकलं की आपण लगेच मत मांडतो, चर्चा करतो, कधी न्यायाधीशासारखे निकालही देतो. मात्र “मी त्या जागी असतो तर?” हा प्रश्न स्वतःला विचारण्याइतकी प्रामाणिकता आपल्यात क्वचितच दिसते.

एखादी वेदना जो पर्यंत आपली होत नाही, तो पर्यंत तिचं खरं वजन आपल्याला जाणवत नाही. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचतो, टीव्हीवर चर्चा पाहतो,सोशल मीडियावर प्रतिक्रिया देतो.पण मनाच्या आत काही हलत नाही. कारण सहानुभूतीचा स्पर्श नसतो. जोपर्यंत आपण स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करत नाही, तोपर्यंत तो अनुभव आपल्या अंतर्मनाला स्पर्श करतच नाही.

अनुभव तेव्हाच शिकवतो, जेव्हा आपण त्या संघर्षात स्वतःला पाहतो. तेव्हा मन अधिक संवेदनशील होतं. ही संवेदनशीलताच आपल्याला शहाणपणाकडे घेऊन जाते. दुसऱ्याच्या चुकांवर हसण्या ऐवजी, “यातून मला काय शिकता येईल?” असा प्रश्न जर आपण स्वतःला विचारला, तर अनेक चुका आपल्या आयुष्यात येण्याआधीच थांबतात.

खरं तर अनुभव हा फक्त भोगण्यासाठी नसतो; तो समजून घेण्यासाठी असतो. स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवांतून शिकण्याची दृष्टी ज्या दिवशी आपल्यात येते, त्या दिवशी समाजाचा आरसा आपल्याला दोष दाखवणारा राहत नाही.तो आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतो. आणि तेव्हाच अनुभव हा खऱ्या अर्थाने गुरु ठरतो.आपल्याला अधिक माणूस, अधिक संवेदनशील आणि अधिक शहाणा बनवणारा.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

API दिपक पाटील यांची यशोगाथा....

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

संतोष शेंडे एक आदर्श ग्रामीण पत्रकार