दोष नेहमी दुसऱ्याचाच असतो…..!

दोष नेहमी दुसऱ्याचाच असतो…..!

काही लोक इतके मोठे शहाणे असतात की त्यांना स्वतःची चूक कधीच दिसत नाही. आयुष्यात काही बिघडलं, नातं दुखावलं, शब्द कटू झाले.या मागचं कारण शोधताना त्यांच्या नजरेसमोर नेहमी समोरचाच उभा असतो. सगळं कसं दुसऱ्यामुळेच घडलं, याची यादी मात्र त्यांच्या मनात अगदी नीट मांडलेली असते. पण त्या यादीत स्वतःचं नाव कधीच नसतं.

हे लोक बोलताना फार मोठं तत्वज्ञान सांगतात. योग्य-अयोग्याची व्याख्या करतात, नात्यांची किंमत सांगतात, आणि समजूतदारपणाचे धडे देतात. पण जेव्हा त्या शब्दांना कृतीची साथ द्यायची वेळ येते, तेव्हा ते सोयीस्कर मौन पाळतात. माफी मागायची वेळ आली की अहंकार आडवा येतो,आणि जबाबदारी स्वीकारायची वेळ आली की शांतता पसरते.

आपल्याला कोणी दुखावलं की त्यांच्या भावना लगेच जाग्या होतात. तेव्हा त्यांना संवेदनशीलता आठवते, आदराची अपेक्षा असते. पण आपण दुसऱ्याला दुखावलं, आपल्या शब्दांनी एखाद्याचं मन मोडलं, आपल्या वागण्याने नात्याला जखम झाली.याची जाणीव मात्र होत नाही. स्वतःच्या स्वार्थाला ते हुशारीचं नाव देतात, आणि दुसऱ्याच्या सहनशीलतेला कमजोरी समजतात.

नातं तुटलं की ते सहज म्हणतात, “समोरचा बदलला.” पण स्वतः आरशात पाहायचं धाडस करत नाहीत. कारण आरशात प्रश्न विचारले जातात, आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रामाणिकपणा लागतो. त्यांच्या शहाणपणात माफी नसते, फक्त स्वतःचं समर्थन असतं. चूक मान्य करणं त्यांना कमीपणा वाटतो, आणि समजून घेण्यापेक्षा जिंकणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं.

अशा लोकांसोबत राहून आपण हळूहळू स्वतःलाच दोष देऊ लागतो. आपणच जास्त संवेदनशील आहोत का, आपणच जास्त अपेक्षा ठेवल्या का, आपणच जास्त प्रेम केलं का असे प्रश्न मनात घर करून बसतात. नकळत आपण सतत अपराधी असल्यासारखे जगू लागतो, आणि आपली शांतता कुठेतरी हरवून जाते.

म्हणूनच कधी कधी अशा फार शहाण्या लोकांपासून दूर राहणं हेच खरं शहाणपण ठरतं. कारण प्रत्येक नातं वाचवताना स्वतःला मोडून घेणं आवश्यक नसतं. मन वाचवण्यासाठी शहाणपणापेक्षा शांती जास्त गरजेची असते. जिथे आपल्याला स्वतःचं अस्तित्व सतत सिद्ध करावं लागतं, तिथून थोडं दूर जाणं हे पलायन नसून आत्मसन्मान असतो. आणि कधी कधी स्वतःची शांती निवडणं हेच आयुष्यातलं सर्वात मोठं शहाणपण ठरतं.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !