गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्यावर…..!


गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्यावर…..!

काही नाती अशी असतात, जी जपता-जपता आपणच थकून जातो. सुरुवातीला सगळं सहज असतं.आपण वेळ देतो, मन देतो, भावना देतो… कारण आपल्याला समोरचा आपलासा वाटतो. पण कधीतरी लक्षात येतं की आपलं देणं वाढत जातं, आणि आपली किंमत मात्र कमी होत जाते. आपण जितकं जास्त झुकतो, तितकं समोरच्याला ते आपलं कर्तव्य वाटू लागतं.

आपली उपस्थिती सवयीची होते. आपलं नसणं काही फरकच पडत नाही. आपण थांबतो, समजून घेतो, माफ करतो पुन्हा पुन्हा. आणि हळूहळू आपल्या मनात एक प्रश्न उगवतो.मी खरंच महत्त्वाचा आहे का, की फक्त सोयीचा?

वेळ, भावना आणि आपुलकी या आयुष्यातल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टी आहेत. त्या कोणाच्या ही हातात सहज देण्यासाठी नसतात. कारण ज्याला तुमच्या वेळेची किंमत कळत नाही, त्याला तुमच्या भावना कधीच समजणार नाहीत. आणि ज्याला तुमच्या उपस्थितीचा सन्मान नाही, त्याच्यासाठी तुम्ही कितीही दिलं, तरी ते कधीच पुरेसं ठरणार नाही.

म्हणूनच कुणाला जवळ येऊ देण्याआधी, कुणासाठी स्वतःला झोकून देण्याआधी एक क्षण थांबणं गरजेचं असतं. तो माणूस तुमचं ऐकून घेतो का? तुमच्या भावना जपतो का? तुमच्या शांततेचा ही आदर करतो का? 

कारण जे लोक तुमचं महत्त्व ओळखतात, ते तुम्हाला कधीही गृहीत धरत नाहीत. ते तुमच्या उपस्थितीचा आदर करतात, आणि तुमच्या अनुपस्थितीत ही तुमची उणीव जाणवतात.आणि जे ओळखत नाहीत, त्यांच्यासाठी स्वतःला कमी करत राहणं व्यर्थ असतं. 

स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात आपणच स्वतःपासून दूर जातो.नातं टिकवण्यासाठी जर तुम्हालाच सतत तुटावं लागत असेल, तर ते नातं तुमच्यासाठी नाही.हे स्वीकारणं जड असलं, तरी गरजेचं असतं.

स्वतःची किंमत स्वतः ठरवली नाही, तर जग ती तुमच्यासाठी ठरवून टाकतं.तुमच्या मौनाचा गैरफायदा घेतं, तुमच्या सहनशीलतेला कमजोरी समजतं. म्हणून द्या, पण मोजून द्या. प्रेम करा, पण स्वतःला विसरून नाही. जपा, पण स्वतःच्या अस्तित्वावर गदा येईल इतकं नाही.कारण शेवटी, तुम्हीच तुमच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहात.आणि स्वतःचं महत्त्व ओळखणं हेच खऱ्या शांततेचं पहिलं पाऊल आहे. 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

API दिपक पाटील यांची यशोगाथा....

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

संतोष शेंडे एक आदर्श ग्रामीण पत्रकार