मनाने मोजली जाणारी श्रीमंती.....!
मनाने मोजली जाणारी श्रीमंती.....!
श्रीमंती म्हणजे फक्त नोटांची जाडी किंवा बँक खात्यातील आकडे नाहीत; श्रीमंती ही माणसाच्या विचारांत, त्याच्या संवेदनशीलतेत आणि वागणुकीत ओळखली जाते. पैसा हातात असू शकतो, पण मन संकुचित असेल तर ती श्रीमंती अपुरी, कोरडी आणि पोकळ ठरते. कारण खऱ्या अर्थाने श्रीमंत तोच असतो, ज्याच्या आयुष्यात समाधान, शांती आणि माणुसकी यांची संगत असते.
आजच्या धावपळीच्या जगात अनेक जण श्रीमंतीचा अर्थ फक्त दिखाव्यात शोधतात. पण दिखावा करणं ही श्रीमंती नसून आतल्या असुरक्षिततेची खूण असते. स्वतःवर, स्वतःच्या अस्तित्वावर विश्वास असणारा माणूस कधीच बाह्य चमकधमक मागत नाही. ज्याचं मन शांत आहे, तो साधेपणात ही तेजस्वी दिसतो.
खरी संपत्ती साठवून ठेवण्यात नाही, तर गरजेच्या वेळी देण्यात आहे. गरज नसताना गोळा करणं हे स्वार्थाचं लक्षण असू शकतं, पण गरजेच्या वेळी कोणासाठी तरी उभं राहणं, मदतीचा हात पुढे करणं, हीच खरी श्रीमंती आहे. पैसा माणसाला मोठं करतो, समाजात नाव देतो; पण विचार त्याला उंचीवर नेतो, माणूस म्हणून घडवतो.
ज्याच्याकडे कृतज्ञतेचं भांडार आहे, तो कधी ही गरीब राहत नाही. कारण त्याला जे आहे त्याची किंमत कळते. छोट्या गोष्टींत आनंद मानणारा माणूस कायम समृद्ध असतो. उलट सगळं असून ही ज्याला समाधान नाही, तो कायम अभावातच जगतो.
माणसांशी वागणुकीत सन्मान, प्रेम आणि नम्रता असेल तर तीच खरी श्रीमंती ठरते. वेळ देणं, मनापासून ऐकून घेणं, विश्वास देणं. या गोष्टी कुठल्या ही तिजोरीत मोजता येत नाहीत, पण त्या आयुष्याला अर्थ देतात. वेळ, प्रेम आणि विश्वास देणारा माणूस आतून अतिशय श्रीमंत असतो.
पैशाने घर भरतं, सुखसोयी येतात; पण माणसाने आयुष्य भरतं. नाती, आठवणी, भावना यांच्या शिवाय आयुष्य फक्त चार भिंतींचं अस्तित्व बनून राहतं. म्हणून श्रीमंती कमवताना माणुसकी गमावू नये. यश मिळवा, पैसा कमवा, पण मन मोठं ठेवा.
कारण शेवटी माणसाची किंमत त्याच्या पैशाने नाही, तर त्याच्या वर्तनाने, विचारांनी आणि माणुसकीने मोजली जाते. आणि हीच खरी, शाश्वत आणि हृदयस्पर्शी श्रीमंती असते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा