‘मीच बरोबर’ या भ्रमाची किंमत...!
‘मीच बरोबर’ या भ्रमाची किंमत...!
अति स्वतःला हुशार समजणाऱ्या माणसांच्या आयुष्यात एक विचित्र शांतता असते.ती आत्मविश्वासाची नसते, तर अहंकाराची असते. त्यांना वाटतं, जगातलं सगळं ज्ञान त्यांनीच मिळवलं आहे. त्यांच्यापेक्षा शहाणं कुणीच नाही, अनुभवी कुणीच नाही. त्यामुळे दुसऱ्याचं मत ऐकणं त्यांना अपमानासारखं वाटतं, आणि प्रेमाने दिलेला सल्ला हस्तक्षेपासारखा भासतो.
अशा लोकांचं मन हळूहळू बंद होत जातं. शिकण्याचे दरवाजे आपोआप बंद होतात. अनुभव सांगणारी माणसं मागे पडतात, चुका दाखवणारी माणसं शत्रू वाटू लागतात. वास्तव समोर असून ही ते मान्य केलं जात नाही. कारण अहंकार डोळ्यांवर असा पडदा टाकतो की योग्य-अयोग्य यातला फरकच अस्पष्ट होतो.
स्वतःच्या बुद्धीवरचा अति विश्वास माणसाला एकटा करतो. कारण नात्यांना ‘बरोबर-चूक’पेक्षा ‘समजून घेणं’ जास्त गरजेचं असतं. सतत “मीच बरोबर” म्हणणाऱ्या माणसासोबत चालताना माणसं थकतात. हळूहळू संवाद कमी होतो, माणसं दूर जातात, आणि शेवटी भोवती गर्दी असूनही तो माणूस एकटा राहतो.
आयुष्य मात्र कुणाच्याही अहंकाराला थांबवत नाही. ते आपली गती चालूच ठेवतं. वेळोवेळी थांबवून, अडवून, वाकवून धडा शिकवतंच. आणि जेव्हा असा माणूस पडतो, तेव्हा तो जोरात आपटतो. कारण पडण्याआधी त्याने कुणाचाच हात धरलेला नसतो. उलट, ज्यांनी हात दिला, ते त्याने दूर ढकललेले असतात.
खरं शहाणपण म्हणजे सगळं माहीत असणं नाही.
खरं शहाणपण म्हणजे मला अजून शिकायचं आहे हे प्रामाणिकपणे मान्य करणं.जो ऐकतो, तो वाचतो.
जो नम्र राहतो, तो वाढतो.आणि जो फक्त स्वतःवरच विश्वास ठेवतो, तो शेवटी स्वतःच्याच भ्रमात हरवतो.
अहंकार माणसाला उंच वाट दाखवतो, पण एकटा.
नम्रता मात्र हातात हात घालून आयुष्य पार करून नेते.
आणि शेवटी…जिंकतो तो हुशार नव्हे,तर समजूतदार माणूस.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा