स्वतःला हरवून जपलेली नाती...!


स्वतःला हरवून जपलेली नाती...!

ज्याला खरंच तुमची गरज असते, तो तुमच्यासाठी मोठमोठी वाक्यं बोलत नाही. तो तुमच्यासमोर स्वतःत बदल घडवतो. कारण त्याला नातं टिकवायचं असतं, जिंकायचं नसतं. त्याला सांगावं लागत नाही, समजावं लागत नाही… तुमच्या वेदना त्याला ऐकू येतात, तुमचं शांत राहणंही त्याला बोचतं. कारण जिथे प्रेम असतं तिथे संवेदना आपोआप जन्म घेतात.

पण ज्याला तुमची गरजच नसते, तो मात्र कायम शब्दांच्या आड लपलेला असतो. प्रत्येक वेळी नवं कारण, नवी सबब, नवे आरोप. तुमच्या प्रत्येक प्रश्नावर तो उत्तर देत नाही, उलट तुम्हालाच दोषी ठरवतो.त्याला बदलायचं नसतं, कारण बदलण्याइतकी किंमत तुमची त्याच्या आयुष्यात नसते. त्याला फक्त वेळ काढायचा असतो… जो वेळ तुमचा असतो, तुमच्या आयुष्याचा असतो.

आपण मात्र आशेच्या दोरीला धरून बसतो. “कदाचित बदलेल”, “कदाचित समजेल” या कदाचितच्या भरोशावर आपला विश्वास, भावना आणि अमूल्य वेळ हळूहळू खर्च होत जातो. आपण थकतो, तुटतो, स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. आपलीच किंमत कमी वाटू लागते. आणि समोरची व्यक्ती? तिला याची साधी जाणीव ही नसते. कारण ज्याला फरक पडतो, तोच बदलतो. बाकीचे फक्त बोलतात.

वेळ हा आयुष्यातला सर्वात मौल्यवान ठेवा आहे. तो चुकीच्या माणसावर खर्च करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं. जिथे प्रयत्न एकतर्फी असतात, जिथे समजून घेणं फक्त तुमचंच काम असतं, तिथे नातं नसतं… ती फक्त एक सवय असते. आणि सवयी प्रेम नसतात, त्या सोडता येतात.

हे वेळेत समजलं, तर आयुष्य खूप हलकं होतं. मन शांत होतं. कारण मग आपण अशा लोकांपासून दूर होतो, जे आपल्याला गृहीत धरतात, आणि अशा लोकांसाठी जागा मोकळी करतो, ज्यांना खरंच आपली किंमत असते.

स्वतःला एवढंच लक्षात ठेवा.ज्याला तुमची गरज असते, तो तुम्हाला गमावण्याचा धोका घेत नाही.आणि ज्याला फरकच पडत नाही, त्याच्यासाठी स्वतःला हरवणं हे प्रेम नसतं… ते फक्त स्वतःवर केलेलं अन्याय असतं.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या