जीवनाच्या प्रवासातील क्षणिक विश्रांती.....!
जीवनाच्या प्रवासातील क्षणिक विश्रांती.....!
दिवसभराच्या धावपळीच्या प्रवासात, शरीर थकते, आणि मनही नकळत शांततेचा शोध घेते. अविरत जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली हसण्याचे क्षण कधी कधी हरवून जातात, आणि आपल्याला वाटते की फक्त पुढे चालत राहणे म्हणजेच जीवन. पण अशा वेळी विरंगुळा हा फक्त विश्रांतीचा क्षण नसतो; तो आपल्याला आपल्या अंतर्मनाशी बोलण्याची संधी देतो.
विरंगुळा म्हणजे शांत चहा घेताना, आवडत्या पुस्तकात हरवताना, किंवा फक्त शांतपणे बसून आपल्या विचारांना वेळ देताना अनुभवलेला एक हळवा संवाद आहे. तो आपल्या थकव्याला सामोरे जातो, आपल्याला पुन्हा उर्जा देतो, आणि प्रत्येक श्वासात आशेचा प्रकाश भरतो.
ही छोटीशी विश्रांतीच आपल्याला आठवण करून देते. की जीवन फक्त जबाबदाऱ्या आणि धावपळीपुरते मर्यादित नाही. विरंगुळा आपल्याला पुन्हा हसण्याची, पुन्हा मनमोकळेपणाने जगण्याची, आणि नव्या उमेदीनं पुढे जाण्याची ताकद देतो.
थकलेल्या शरीराला जसा विश्रांतीची गरज असते, तसाच मनालाही विरंगुळ्याची आवश्यकता असते. आणि जेव्हा आपण पुन्हा जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करतो, तेव्हा जाणवते की विरंगुळा फक्त थकलेल्या क्षणाचा आधार नव्हता, तर तो एक प्रकाश सृष्टी होता.जो आपल्याला पुन्हा उमेद, उत्साह आणि आनंद देतो.विरंगुळा घेणे म्हणजे स्वतःला जिवंत ठेवणे, स्वतःशी संवाद साधणे, आणि जीवनाला हसत-मुस्करात स्वीकारणे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा