कुणाच्या ताटात ढवळाढवळ करू नये….!
कुणाच्या ताटात ढवळाढवळ करू नये….!
कुणाच्या ताटात जाऊन ढवळाढवळ करू नये,
कारण प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे त्याचं स्वतःचं ताट असतं.त्या ताटात त्याने आयुष्यभर गोळा केलेले अनुभव असतात.
कष्टांनी मिळवलेले घास असतात.कधी समाधानाची भाजी असते,तर कधी अपयशाची कडू चवही असते.
भाकर्या, मीठ-भाजी, गोड-कडू क्षण हे सगळं त्याने स्वतःच्या श्रमांनी, चुका करून, पडत-उठत कमावलेलं असतं.
अशा ताटात परवानगी शिवाय हात घालणं म्हणजे
फक्त हस्तक्षेप नव्हे,तर त्या माणसाच्या आत्मसन्मानावर, स्वाभिमानावर दिलेली ठेच असते.कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं,आणि प्रत्येकाच्या संघर्षाची खोली त्यालाच ठाऊक असते.
सहकार्य म्हणजे समोरच्याचं ताट हिसकावून घेणं नाही.
सहकार्य म्हणजे त्याला जेवू न देता आपण पुढे निघून जाणंही नाही.खरं सहकार्य म्हणजे तो घास नीट पकडू शकत नसेल, तर त्याचा हात घट्ट पकडणं.तो पडत असेल, तर त्याला सावरण्यासाठी खांद्यावर हात ठेवणं.
तो हरवला असेल, तर वाट दाखवणं.वाट चोरणं नव्हे.
आजच्या जगात एखाद्याला शिकायची संधी न देता
त्याच्या चुका मोठ्या करून दाखवणं फार सोपं झालं आहे.चार शब्द, दोन आरोप आणि एक शिक्का
माणूस क्षणात लहान केला जातो.
टीका करायला मेहनत लागत नाही,पण मार्गदर्शन करायला मन मोठं लागतं.उणीव दाखवणं सहज शक्य असतं,पण ती भरून काढण्यासाठी संयम, समज
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी लागते.
खरं सहकार्य करणारे लोक कधीच नावासाठी काम करत नाहीत.
त्यांना श्रेयाची घाई नसते,ना टाळ्यांची अपेक्षा, ना प्रसिद्धीची भूक.ते पडद्यामागे उभं राहून दुसऱ्याला यशस्वी होताना पाहतात आणि त्याच क्षणी त्यांच्या मनात समाधान भरून येतं.कारण त्यांना माहीत असतं.
आज दिलेली निःस्वार्थ साथ.
उद्या कुणाचं संपूर्ण आयुष्य घडवू शकते.खरं सहकार्य गोंगाट करत नाही.ते जाहिरातीत झळकत नाही.ते आवाजात नसतं, ते कृतीत असतं.ते शांत असतं,
पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मजबूत आधार बनून उभं राहतं.ते ‘मी’ दाखवण्यासाठी नसतं,ते ‘आपण’ घडवण्यासाठी असतं.
म्हणूनच,कुणाच्या ताटात ढवळाढवळ न करता,
त्याला स्वतःच्या हाताने जेवू देणं,त्याच्या ताटातलं जेवण सुरक्षित राहील याची काळजी घेणं,आणि गरज पडली तर त्याच्या शेजारी शांतपणे बसून फक्त साथ देणं हेच खरं सहकार्य.हेच खरं माणूसपण.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा