पदाच्या तोऱ्यात हरवलेलं आयुष्य....!


पदाच्या तोऱ्यात हरवलेलं आयुष्य....!

कितीही मोठा अधिकारी असो, कितीही प्रसिद्ध समाजसेवक असो पदावर असताना त्याचं जगणं वेगळंच असतं. नावापुढची पदवी, खुर्चीभोवतीचं वलय, लोकांच्या नजरा, शब्दांतली आदराची कंपने… सगळं काही त्याच्यासोबत असतं. पण त्या सगळ्याचा केंद्रबिंदू तो माणूस नसतो, तर त्याचं पद असतं.हे सत्य अनेकांना फार उशिरा उमगतं.

एक दिवस येतो, जेव्हा पद सुटतं. कायमचं. फाइल्स, दालनं, शिपाई, गाडीचा ताफा सगळं मागे राहतं. आणि तेव्हाच आयुष्याची खरी परीक्षा सुरू होते. कारण तेव्हा समाज माणसाकडे पाहतो, पदाकडे नाही. पण जर त्या क्षणानंतर ही तो माणूस “मी काय होतो” या अहंकाराच्या ओझ्याखाली वागत राहिला, माजी पदाच्या तोऱ्यातच बोलू-वागू लागला,तर समाज त्याच्यापासून दूर सरकतो.हळूच, शांतपणे, पण ठामपणे.

समाजाला गर्व सहन होत नाही, विशेषतः तो गर्व भूतकाळावर आधारलेला असेल तर. पद गेल्यावर ही जो माणूस अपेक्षा करतो की लोकांनी तसाच मान द्यावा, तशीच भीती बाळगावी, त्याला समजून घ्यायला हवं की तो मान कधीच त्याचा नव्हता. तो पदाचा होता. आणि पदासोबत तो ही निघून गेला.

खरं सांगायचं तर, पद हे तात्पुरतं असतं; पण माणूस म्हणून कमावलेली जागा कायमची असते. जो अधिकारी किंवा समाजसेवक पदावर असताना नम्र राहतो, सामान्य माणसात मिसळतो, अधिकारापेक्षा माणुसकी जपतो. तो पद गेल्यावर ही लोकांच्या मनात जिवंत राहतो. पण ज्याने आयुष्यभर फक्त खुर्चीला धरून स्वतःचं मोठेपण मोजलं, त्याचं उर्वरित आयुष्य मग केवळ आठवणींच्या सावलीत काढलं जातं. आणि अशा आयुष्याला अर्थ उरत नाही.

पदावरून उतरल्यावर जर माणूस स्वतःही खाली उतरायला तयार नसेल सामान्यपणे जगायला, ऐकायला, शिकायला तयार नसेल तर समाजात त्याला कवडीचीसुद्धा किंमत राहत नाही. कारण समाजाला मोठी नावे नको असतात, तर मोठी मने हवी असतात.

आयुष्याच्या शेवटी मागे वळून पाहताना पदांची यादी उपयोगाची ठरत नाही. तेव्हा उपयोगी पडतात ती नाती, दिलासा देणारे शब्द, कुणासाठी तरी उभं राहिल्याची आठवण. हे सगळं नसेल, तर कितीही मोठं पद भूषवलं असलं तरी उरलेलं आयुष्य व्यर्थच गेलं.असं म्हणायला हरकत नाही.म्हणूनच,पद सुटणं हे अपयश नाही.पण पद सुटल्यावर ही अहंकार न सुटणं हेच खरं अपयश आहे.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !