वारशाने मिळालेलं व्यासपीठ आणि स्वतःच्या हिमतीने कमावलेल्या टाळ्या....!


वारशाने मिळालेलं व्यासपीठ आणि स्वतःच्या हिमतीने कमावलेल्या टाळ्या....!

जन्मताना आपण कोणत्या घरात जन्माला येतो, हे आपल्या हातात नसतं. काहींना संपत्तीचा वारसा लाभतो, काहींना नावाचा, तर काहींना कर्तृत्ववान आई-वडिलांची ओळख. त्या ओळखीमुळे अनेकदा आयुष्याच्या सुरुवातीला एक सुंदर, सजलेलं व्यासपीठ आपल्यासमोर उभं राहतं. लोकांची नजर आपल्याकडे वळते, दारं आपोआप उघडतात, आणि संधी सहजपणे हाताशी येतात.

पण त्या व्यासपीठावर उभं राहणं आणि त्या व्यासपीठावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं यात खूप
मोठा फरक असतो.वडिलांचं नाव सांगितल्यावर मिळणारी पहिली ओळख ही कदाचित अभिमानाची असते; पण ती कायम टिकणारी नसते. कारण लोक सुरुवातीला तुमच्याकडे कुतूहलाने पाहतात, पण नंतर ते तुमच्याकडून कर्तृत्वाची अपेक्षा करतात. “अमुक व्यक्तीचा मुलगा/मुलगी” ही ओळख एका टप्प्यापर्यंत साथ देते, पण त्यानंतर जग विचारतं “तुझं स्वतःचं काय?”

वारसा आपल्याला संधी देतो, पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी लागणारी मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा आणि चिकाटी मात्र आपल्यालाच दाखवावी लागते. व्यासपीठावर उभं राहणं सोपं असतं; पण लोकांच्या मनात स्थान निर्माण करणं कठीण असतं. टाळ्या वडिलांच्या नावासाठी वाजू शकतात, पण त्या क्षणिक असतात. खऱ्या टाळ्या त्या असतात ज्या तुमच्या कष्टांमुळे, तुमच्या घामामुळे आणि तुमच्या संघर्षामुळे घुमतात.

अनेकदा वारसा हा आशीर्वाद असतो, पण तोच कधी कधी ओझंसुद्धा बनतो. कारण तुलना कायम सुरू असते. “बाबांसारखं नाही”, “त्यांच्या उंची पर्यंत पोहोचशील का?” अशा प्रश्नांच्या सावलीत स्वतःची ओळख शोधणं अवघड होतं. पण याच सावलीतून बाहेर पडून स्वतःचा प्रकाश निर्माण करणं हीच खरी किमया आहे.

खरं यश म्हणजे वडिलांच्या नावाला न्याय देणं नव्हे, तर त्या नावात स्वतःची एक नवीन ओळख जोडणं. जेव्हा लोक म्हणतात, “हे अमुकचे वडील आहेत,” तेव्हा तीच खरी कमाई असते. त्या क्षणी वारसा आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम घडतो.

आपल्याला मिळालेलं व्यासपीठ हे प्रारंभ असू शकतं, पण शेवट नाही. त्या व्यासपीठावरून पडद्याआड जाण्यापूर्वी आपण आपल्या कर्तृत्वाची एक वेगळी छाप उमटवली पाहिजे. कारण इतिहास वारशाला लक्षात ठेवत नाही; तो कर्तृत्वाला लक्षात ठेवतो.

म्हणूनच, वारशाचा अभिमान बाळगा, पण त्यावर विसंबून राहू नका. वडिलांचं नाव प्रेरणा म्हणून घ्या, आधार म्हणून नव्हे. तुमची स्वप्नं, तुमची मेहनत आणि तुमचं धैर्य यांवर विश्वास ठेवा.

कारण व्यासपीठ वारशाने मिळू शकतं…पण त्या व्यासपीठावर घुमणाऱ्या टाळ्या मात्र नेहमीच स्वतःच्या हिमतीवर कमवाव्या लागतात.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !