स्वतःचा वकील, इतरांचा न्यायाधीश माणसं....!


स्वतःचा वकील, इतरांचा न्यायाधीश माणसं....!

माणूस खरोखर विलक्षण आहे. तो संवेदनशील आहे, विचारशील आहे, समजूतदार आहे.परंतु अनेकदा ही समजूतदारी तो केवळ स्वतःपुरतीच जपतो.

स्वतःकडून एखादी चूक घडली की तो मनात एक अदृश्य न्यायालय उभे करतो. त्या न्यायालयात तोच वकील असतो, तोच साक्षीदार असतो आणि शेवटी तोच निर्दोष ठरलेला आरोपी ही असतो. शब्दांचा आधार घेतो, कारणांची ढाल उभी करतो आणि स्वतःचाच खटला लढू लागतो.

तो स्वतःलाच समजावतो “मी मुद्दाम केलं नव्हतं…”
“परिस्थिती माझ्या हातात नव्हती…” “माझा हेतू चुकीचा नव्हता…” “मला कोणी समजून घेतलं नाही…”

अशा असंख्य कारणांनी तो स्वतःला मोकळं करतो. स्वतःच्या अश्रूंना स्पष्टीकरण देतो, स्वतःच्या रागाला योग्य ठरवतो, स्वतःच्या वागण्याला परिस्थितीची किनार लावतो. त्याला स्वतःचे दुःख दिसते, स्वतःचा संघर्ष जाणवतो, स्वतःची अपूर्णता समजते. आणि मग तो स्वतःलाच माफ करून टाकतो.परंतु जेव्हा दुसऱ्याची चूक त्याच्या नजरेस पडते, तेव्हा चित्र पूर्णपणे बदलते.

त्याच मनातले न्यायालय अचानक कठोर होते. तिथे सहानुभूती नसते, संयम नसतो, विचारांची जागा नसते.
फक्त निकाल असतो. तो क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्याला दोषी ठरवतो. त्या व्यक्तीची परिस्थिती काय होती, त्याच्या मनात किती वेदना होत्या, त्याने कोणते संघर्ष झेलले.याचा विचारही तो करत नाही.

आपण स्वतःसाठी माफीचे हजार मार्ग शोधतो,मग इतरांसाठी एकही कारण का शोधत नाही?आपण स्वतःसाठी जेव्हा समजूतदार होतो,तेव्हा इतरांसाठी इतके कठोर का बनतो?

कदाचित आपण विसरतो की प्रत्येक जण आपल्या आयुष्यात अदृश्य लढाया लढत असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यामागे एक न सांगितलेली कथा असते. प्रत्येक चुकामागे एखादी वेदना, एखादा संघर्ष, एखादी जखम किंवा अपूर्णतेची छाया दडलेली असते.

ज्याच्यावर आपण टीका करतो, तो ही कदाचित रात्री शांतपणे तुटत असेल.ज्याला आपण दोष देतो, तो ही आतून अपराधीपणाने जळत असेल.ज्याच्यावर आपण बोट ठेवतो, त्यानेही कदाचित शंभर वेळा योग्य करण्याचा प्रयत्न केला असेल.

न्यायाधीश होणं सोपं आहे. क्षणात निर्णय देता येतो. शब्दांनी शिक्षा सुनावता येते. परंतु समजून घेणं.ही मोठेपणाची खरी कसोटी आहे. दुसऱ्याच्या जागी स्वतःला उभं करून पाहणं, त्याच्या वेदनेचा अंदाज घेणं आणि तरीही त्याला साथ देणं हीच खरी माणुसकी आहे.

चुका माणसाकडूनच होतात. परिपूर्णता हा माणसाचा स्वभाव नाही. पण त्या चुका समजून घेण्याची, माफ करण्याची आणि नात्यांना जपण्याची ताकद मात्र माणसातच असते.

जर आपण स्वतःसाठी जशी माया, सहानुभूती आणि समजूत राखतो, तशीच थोडीशी इतरांसाठी ठेवली, तर कित्येक तुटलेली नाती वाचतील. कित्येक गैरसमज दूर होतील. मनांवर साचलेली कटुता हलकी होईल. आणि कदाचित अनेक हृदयं पुन्हा एकदा हसायला शिकतील.

थोडं कमी न्यायाधीश होऊ या,आणि थोडं अधिक माणूस बनू या.स्वतःचा वकील होताना, इतरांसाठीही थोडं वकील व्हायला शिकूया.कारण शेवटी, जिंकलेले वाद विसरले जातात.पण जपलेली नाती आयुष्यभर साथ देतात.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !