कृपेवर नव्हे, कर्तृत्वावर उभे रहा...!


कृपेवर नव्हे, कर्तृत्वावर उभे रहा...!

जगात प्रत्येक माणूस काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत असतो.मान, पैसा, पद, प्रतिष्ठा, ओळख. या धावपळीत काही जण इतके पुढे जातात की नकळत स्वतःचाच स्वाभिमान गहाण ठेवतात. त्यांना वाटते, मोठ्या माणसांच्या सावलीत उभे राहिले,त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान डोलावली, त्यांच्या स्तुतीत गोड शब्द विणले, तर आपल्यालाही थोडे मोठेपण लाभेल. पण ते विसरतात. उधार घेतलेला प्रकाश कधीच स्वतःचा होत नाही.

चमचागिरी म्हणजे केवळ गोड बोलणे नव्हे;ती आत्म्याची गळचेपी असते. जेव्हा आपण सत्य दडपून खोट्याला साथ देतो, तेव्हा आपण फक्त दुसऱ्याला खूश करत नाही.आपण स्वतःला हरवत असतो.आपल्या विचारांचा, आपल्या तत्त्वांचा, आपल्या आवाजाचा गळा घोटत असतो. हळूहळू स्वतःच्या मताची किंमत आपल्यालाच उरत नाही.

काहींना वाटते “मोठ्यांच्या जवळ राहिलो की आपल्याला ही मोठेपणा मिळेल.” पण खरे मोठेपण दुसऱ्याच्या कृपेवर उभे राहत नाही; ते स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहते. दुसऱ्याच्या सावलीत उभे राहणे सोपे असते, कारण तिथे उन्हाची झळ लागत नाही. पण स्वतःच्या सूर्यप्रकाशात उभे राहण्यासाठी धैर्य लागते, आत्मविश्वास लागतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वाभिमान लागतो.

जगात काही गोष्टी पैशाने विकत मिळतात.सत्ता, पद, प्रतिष्ठा. परंतु स्वाभिमान? तो कोणत्याही बाजारात मिळत नाही. तो ना विकत घेता येतो, ना उधार घेता येतो. तो फक्त आपल्या कृतींनी, आपल्या तत्त्वांनी आणि आपल्या कष्टांनी कमवावा लागतो.

ज्यांना सतत दुसऱ्याच्या आदेशावर जगण्याची सवय लागते, त्यांना स्वतःच्या निर्णयाची ताकद कधीच कळत नाही. ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर बोलतात, कोणाच्या तरी मान्यतेवर चालतात. पण परिस्थिती कायम एक सारखी राहत नाही. पदे बदलतात, नाती बदलतात, सत्तेची समीकरणे बदलतात. आणि एक दिवस, ज्यांच्यासाठी ते झुकले होते तेच पुढे निघून जातात. मागे उरतो तो केवळ रिकामेपणा आणि आरशात दिसणारा स्वतःचाच हरवलेला चेहरा.

स्वाभिमान हा सोन्यापेक्षाही मौल्यवान असतो. सोनं हरवलं तर पुन्हा मिळवता येतं; पण आत्मसन्मान तुटला की त्याचे तुकडे गोळा करायला आयुष्य खर्ची पडते. म्हणूनच स्वतःचा आवाज दाबू नका, स्वतःची किंमत कमी करू नका. कोणाच्याही टाळ्यांसाठी स्वतःचे तत्त्व सोडू नका, आणि कोणाच्याही सावलीसाठी स्वतःचा सूर्य हरवू नका.

खरे यश म्हणजे दुसऱ्याच्या पायाशी बसून टाळ्या वाजवणे नव्हे; तर स्वतःच्या कर्तृत्वाने टाळ्या मिळवणे होय. खरे समाधान म्हणजे कुणाच्या कृपेने मिळालेलं पद नव्हे; तर आपल्या मेहनतीने मिळवलेले स्थान होय. स्वतःच्या डोळ्यांत डोळे घालून पाहताना अभिमान वाटावा.हीच खरी कमाई आहे.

आपण कोण आहोत, हे दुसऱ्याच्या शब्दांनी ठरत नाही; ते आपल्या कृतींनी ठरते. आपली ओळख आपण किती झुकतो यावर नाही, तर किती ताठ उभे राहतो यावर घडते.

कारण शेवटी, माणसाची खरी किंमत त्याच्या स्वाभिमानात असते. आणि तो एकदा गमावला, तर कोणतेही मोठेपण, कोणतीही सत्ता, कोणतीही प्रतिष्ठा त्याची भरपाई करू शकत नाही.

म्हणून धैर्याने जगा, प्रामाणिकपणे उभे रहा, आणि आपल्या स्वाभिमानाचे रक्षण करा. कारण जग आपल्याला तितकीच किंमत देते, जितकी आपण स्वतःला देतो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !