मराठी गझल एक समृद्ध प्रवाह....!
शनिवार दि.७ फेब्रुवारी २०२६ व रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलन संपन्न होत आहे त्यानिमित्त हा लेख.
-------------------------------------------------
अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
सुरेश भट एक महान गझल सम्राट
मराठी गझल एक समृद्ध प्रवाह
शनिवार दि.७ फेब्रुवारी २०२६ व रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलन संपन्न होत आहे त्यानिमित्त हा लेख प्रपंच .
या अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनामध्ये संपूर्ण भारतातून आलेल्या गझलकरांचे हार्दिक अभिनंदन ॥ आणि या अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा ॥
मराठी साहित्याच्या प्रांतात 'गझलसम्राट' म्हणून ओळखले जाणारे सुरेश भट हे केवळ एक कवी नव्हते, तर ते मराठी गझलेला घराघरात पोहोचवणारे एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्व होते. त्यांनी उर्दूतील हा काव्यप्रकार मराठी मातीत इतक्या ताकदीने रुजवला की आज 'मराठी गझल' हा एक स्वतंत्र आणि समृद्ध प्रवाह बनला आहे.त्यांच्या गझल कार्याचे मुख्य पैलू म्हणजे मराठी गझलेला प्रतिष्ठा मिळवून दिली .सुरेश भटांच्या आधीही काही कवींनी गझल लिहिण्याचा प्रयत्न केला होता, पण तिला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा आणि लोकप्रियता भटांनी मिळवून दिली. त्यांनी गझलेच्या वृत्त (बह्र) आणि तंत्रावर (काफिया-रदीफ) कमालीची हुकूमत मिळविली होती.त्यांच्या गझलेत आशय आणि विषयांची व्याप्ती होती .भटांच्या गझला फक्त प्रेम आणि विरहापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्यांनी गझलेतून सामाजिक बंडखोरी प्रस्थापित अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.राजकीय भाष्य केले .समाजातील दांभिकपणावर प्रहार केले.मानवी जीवनाचे गूढ उकलले.सुरेश भट यांनी मराठी कवितेत 'गझल' हा काव्यप्रकार अत्यंत प्रभावीपणे रूजवला. त्यांच्या शब्दांत जर जरब होती, तर स्वरात अथांग वेदना आणि प्रेम होते. त्यांच्या काही प्रसिद्ध रचना आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गायल्या जातात .त्यांच्या लेखणीतून उमटलेली प्रत्येक ओळ ही सामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. त्यांनी केवळ प्रेम कविताच लिहिल्या नाहीत, तर समाजातील अन्यायावर आपल्या शब्दांतून प्रहारही केले.
'रंग माझा वेगळा' या एका गझल संग्रहाने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली .
या गझलसंग्रहाने मराठी साहित्यात इतिहास घडवला. "रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा " या ओळीतून त्यांनी स्वतःची स्वाभिमानी आणि स्वतंत्र वृत्ती मांडली. त्यांच्या गझलांमधील 'शेर' हे सुभाषित असल्यासारखे चपखल असायचे.गझलचे लोकशाहीकरण आणि प्रसाराचे कार्य त्यांनी गझलेतून केले .सुरेश भटांनी केवळ स्वतः गझल लिहिली नाही, तर त्यांनी अनेक तरुण कवींना गझल लिहायला शिकवले.गझल कार्यशाळा स्वतः घेतल्या . त्यांनी महाराष्ट्रभर फिरून गझलेचे तंत्र समजावून सांगितले मार्गदर्शन केले .अनेक नवोदित गझलकारांना त्यांनी घडवले, ज्यामुळे आज मराठीत गझलकारांची एक मोठी फळी उभी आहे.त्यांच्या गझलांना हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या दिग्गजांनी संगीत दिले आणि लता मंगेशकर, सुरेश वाडकर यांसारख्या गायकांनी त्या अजरामर केल्या.
उदाहरणार्थ: "मलमली तारुण्य माझे", "केव्हा तरी पहाटे", "उष:काल होता होता" ,"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ". इत्यादी.
गझल सम्राट सुरेश भट यांचे अनेक गझल संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.' रूपगंधा 'या काव्यसंग्रहात सुरुवातीच्या काळातील समृद्ध कविता आणि गझल आहेत .'रंग माझा वेगळा' हा गझलेचा सुवर्णकाळ मांडणारा गझल संग्रह आहे . सामाजिक आणि विद्रोही जाणीवांचा आविष्कार म्हणजे 'एल्गार' तर गझलेतील विविध छटांचे दर्शन घडविणारा गझल संग्रह म्हणजे'सप्तरंग' होय. सुरेश भटांनी मराठी गझलेला "अभिजातता" आणि "लोकप्रियता" या दोन्ही टोकांचा संगम घडवून दिला. त्यांनी गझलेच्या माध्यमातून मराठी भाषेचे सामर्थ्य जगाला दाखवून दिले आणि मराठी गझलला घराघरात पोहोचविले.अशा या महान गझल सम्राट सुरेश भट यांना विनम्र अभिवादन.
संत कबीर कवीराज राज्यस्तरीय
पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व कवी
प्रा.अरुण बाबाराव बुंदेले, अमरावती.८०८७७४८६०९.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा