सेवेच्या मुखवट्याआडचा स्वार्थ.....!

सेवेच्या मुखवट्याआडचा स्वार्थ.....!

“समाजसेवक” हा शब्द उच्चारला की मनात आदराची भावना जागी व्हायला हवी. डोळ्यांसमोर यायला हवेत त्याग, निस्वार्थीपणा, आणि माणुसकीसाठी झटणारे हात. पण आज काळ असा आला आहे की या पवित्र नावाखाली काही लोकांनी इतकी घाण साठवून ठेवली आहे, की खऱ्या समाजसेवकाची ओळखच धूसर होत चालली आहे.

समाजसेवा ही प्रसिद्धीसाठी नसते, ती असते मनासाठी. ती असते त्या आईच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी, जी आपल्या लेकरासाठी दोन वेळच्या भाकरीसाठी झगडते. ती असते त्या वृद्धासाठी, ज्याला आपल्या मुलांनीच दाराबाहेर काढलं आहे. पण काही जणांनी या सेवाभावाला व्यवसाय बनवून टाकलं आहे. मदतीपेक्षा फोटो, कामापेक्षा जाहिरात, आणि सेवाभावापेक्षा स्वार्थ  हेच जणू त्यांचं ब्रीदवाक्य बनलं आहे.

जेव्हा समाजसेवेच्या नावाखाली दिखाऊपणा होतो, तेव्हा लोकांच्या मनात संशय निर्माण होतो. “हे खरंच मदत करत आहेत का? की स्वतःचा फायदा बघत आहेत?” हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहतो. आणि याच संशयाच्या सावलीत खरे समाजसेवकही अडकतात. जे लोक वर्षानुवर्षे शांतपणे, कुठलीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी झटत असतात, त्यांनाही स्वतःची प्रामाणिकता सिद्ध करावी लागते. हीच खरी वेदना आहे.

खरा समाजसेवक कधी स्वतःचा गवगवा करत नाही. तो अंधारातही दिवा लावतो, पण त्या दिव्याचं श्रेय घेत नाही. त्याला टाळ्यांची अपेक्षा नसते; त्याला समाधान मिळतं ते एखाद्या गरजूच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हसण्यातून. त्याचं मन स्वच्छ असतं, हेतू शुद्ध असतो, आणि कृती प्रामाणिक असते.

पण काही स्वार्थी लोकांच्या वागण्यामुळे जेव्हा “समाजसेवक” हा शब्दच संशयास्पद ठरतो, तेव्हा त्या शब्दाची पवित्रता जपणाऱ्या लोकांच्या हृदयाला खोल जखम होते. जणू एखाद्या स्वच्छ नदीत कुणीतरी मुद्दाम घाण टाकून तिचं पाणी गढूळ केलं आहे. नदी अजून ही स्वच्छ असते, पण तिच्या पाण्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला असतो.

आज गरज आहे ती खऱ्या आणि खोट्या समाजसेवेतील फरक ओळखण्याची. आपल्या डोळ्यांवरची दिखाऊ पणाची पट्टी काढून टाकण्याची.कारण खरा समाजसेवक बदनाम होणं म्हणजे आपल्या समाजातील माणुसकीचा अपमान होणं आहे.

चला, आपणच ठरवू या समाजसेवा ही नावासाठी नाही, तर भावनेसाठी आहे. स्वार्थासाठी नाही, तर माणुसकीसाठी आहे. आपण प्रत्येकाने आपल्या परीने एक छोटं का होईना, पण प्रामाणिक पाऊल उचलूया. जेणेकरून उद्या “समाजसेवक” हा शब्द पुन्हा एकदा अभिमानाने उच्चारला जाईल आणि त्या शब्दामागे उभं असेल स्वच्छ मन, मोठं हृदय आणि खरी माणुसकी.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !