बोगस नोंदणींच्या सावलीत हरवलेला कष्टकरी...!
बोगस नोंदणींच्या सावलीत हरवलेला कष्टकरी...!
“खरंच सर्वच लोक बांधकाम कामगार आहेत का?”
एका घामाच्या थेंबाचा निःशब्द आक्रोश सकाळचे पाच वाजलेले असतात. शहर अजून अर्धवट झोपेत असतं. रस्त्यांवर शांतता असते, दिव्यांचा पिवळसर उजेड अजूनही लुकलुकत असतो. पण एका चाळीत, एका छोट्याशा झोपडीत दिवस उगवलेला असतो.
चुलीवर चहा उकळत असतो. एका आईने डब्यात कोरडी भाकरी आणि थोडी भाजी ठेवलेली असते. एका बापाने आपल्या लेकराच्या डोक्यावर हात फिरवलेला असतो.त्या स्पर्शात प्रेम असतं, जबाबदारी असते, आणि एक न बोललेली चिंता असते.आणि तो निघतो…बांधकामाच्या साईटकडे.
हातात फावडा. खांद्यावर कर्ज. मनात लेकरांच्या शिक्षणाची स्वप्नं. डोक्यावर जुनं हेल्मेट. आणि पायात जड चपला, ज्यांनी कित्येक मैल उन्हात चाललेलं असतं.
तो उंच इमारती उभ्या करतो.तो शहराला आकार देतो.
तो काँक्रीटच्या ढिगाऱ्याला स्वप्नांची वास्तू बनवतो.
विटा रचताना त्याचे हात रक्ताळतात. सिमेंट मिसळताना धूळ फुफ्फुसात शिरते. लोखंडी सळया उचलताना स्नायू ताणले जातात. उन्हात भाजून अंग काळवंडतं, पावसात भिजून अंग थरथरतं. तरीही तो काम थांबवत नाही.
कारण त्याच्यासाठी हा फक्त रोजगार नाही.ही त्याच्या कुटुंबाची जीवनरेखा असते.तो इमारतींचे पाया मजबूत करतो,पण त्याचं स्वतःचं आयुष्य मात्र अजूनही पायाभरणीतच अडकलेलं असतं.
शासनाने अशा कष्टकऱ्यांसाठी योजना सुरू केल्या. आरोग्य सहाय्य, अपघात विमा, शैक्षणिक मदत, निवृत्ती लाभ या योजना म्हणजे त्यांच्या आयुष्याला मिळालेली आधाराची काठी. संकटाच्या वेळी छत्रछाया. मुलांच्या भविष्यासाठी आशेचा किरण.पण आज एक वेदनादायक प्रश्न मनाला टोचतो खरंच सर्वच लोक बांधकाम कामगार आहेत का?
आज अनेक जण, ज्यांचा बांधकामाशी थेट संबंध नाही, ते सुद्धा या योजनांचा लाभ घेताना दिसतात. कायम स्वरूपी नोकरी करणारे, आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक, मोठे शेतकरी काही पैशांत कागदपत्रं तयार होतात. दलाल एजंटांच्या साखळीतून नोंदणी पूर्ण होते. कागदोपत्री “बांधकाम कामगार” तयार होतात.
आणि मग…खरा कामगार रांगेत उभाच राहतो.
त्याच्याकडे माहिती नसते. त्याला ऑनलाइन प्रक्रिया समजत नाही. त्याच्याकडे पूर्ण कागदपत्रं नसतात. त्याच्याकडे वेळ नसतो. कारण तो रोजंदारीवर काम करतो. एक दिवस काम नाही म्हणजे त्या दिवशी घरात चूल पेटत नाही.
त्याच्या हातावर फोड असतात.पायांवर भेगा असतात.
चेहऱ्यावर काळजीच्या रेषा असतात.तो आपल्या हक्कासाठी धडपडतो…पण त्याचा हक्क कुणीतरी दुसराच घेऊन जातो.हा केवळ पैशांचा प्रश्न नाही.हा न्यायाचा प्रश्न आहे.हा माणुसकीचा प्रश्न आहे.
एका खऱ्या बांधकाम कामगाराचा घाम फक्त सिमेंटमध्ये मिसळत नाही. तो आपल्या शहरांच्या भिंतींमध्ये जिवंत राहतो. आपण ज्या इमारतींमध्ये सुरक्षित झोपतो, त्या भिंतींमध्ये त्याच्या श्रमांचा सुगंध असतो. आपण ज्या पुलांवरून प्रवास करतो,त्या पुलांमध्ये त्याच्या मेहनतीचा ठसा असतो.पण त्याच्या स्वतःच्या घरावर अजूनही गळका कौल असतो.
जर बोगस नोंदणींची सखोल चौकशी झाली, पात्रतेची काटेकोर पडताळणी झाली आणि दोषींवर कठोर कारवाई झाली. तरच खऱ्या कष्टकऱ्यांना न्याय मिळेल. अन्यथा योजना वाढतील, कागदोपत्री आकडे वाढतील… पण विश्वास कमी होत जाईल.
आज गरज आहे प्रणाली स्वच्छ करण्याची.गरज आहे दलालांच्या साखळीला तोडण्याची गरज आहे.
पारदर्शकतेची.गरज आहे प्रामाणिकपणाची.आणि सर्वात महत्त्वाचं गरज आहे त्या घामाच्या थेंबाचा सन्मान करण्याची, ज्याने आपली शहरं उभी केली.
प्रत्येकजण बांधकाम कामगार नसतो.पण जो खरा बांधकाम कामगार आहे. त्याच्या डोळ्यातली आशा तुटू देऊ नका.कारण त्याचा घाम केवळ इमारती उभारत नाही.तो आपल्या समाजाचा पाया घडवत असतो.आणि त्या पायाला न्याय मिळालाच पाहिजे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा