शास्त्री फार्मसी महाविद्यालय, एरंडोल लोकशाही, शिक्षण आणि संस्कारांचा मंगल संगम....!
शास्त्री फार्मसी महाविद्यालय, एरंडोल लोकशाही, शिक्षण आणि संस्कारांचा मंगल संगम....!
एरंडोल शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात अभिमानाने नोंदवला जाईल असा एक सोहळा शास्त्री फार्मसी महाविद्यालयात अनुभवायला मिळाला. शिवजन्मोत्सवाच्या पावन औचित्याने आयोजित नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा नागरी सत्कार हा केवळ सन्मानाचा कार्यक्रम नव्हता, तर तो लोकशाहीवरील विश्वास, शिक्षणावरील निष्ठा आणि समाजकारणाची जाणीव यांचा हृदयस्पर्शी उत्सव होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोलदादा पाटील यांची उपस्थिती सोहळ्याला विशेष उंची देणारी ठरली. एरंडोल नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्ष सौ. .सुनीता माळी तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. हा सत्कार म्हणजे जनतेच्या विश्वासाचा सन्मान होता.
सत्कारमूर्तींमध्ये गटनेते प्रा. मनोज पाटील, जिजाबाई पाटील, अनिल महाजन, पठाण दलशेख, कल्पना पाटील, आरती महाजन, सय्यद जाफर, छायाबाई दाभाडे, भारती गुजर, सय्यद नरुद्दीन, गीतांजली ठाकूर, कृष्णा ओतारी, कागदी सय्यद, अमोल तांबोळी, नितेश चौधरी, योगेश महाजन, मयूर महाजन, रवींद्र महाजन आणि नरेंद्र पाटील यांचा समावेश होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जबाबदारीची जाणीव आणि समाजासाठी काहीतरी घडवण्याची तळमळ स्पष्ट जाणवत होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. सभागृहात दुमदुमणारा जयघोष आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रेरणादायी सादरीकरणे वातावरण अधिकच भारावून टाकणारी होती. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने शौर्य, दूरदृष्टी, संघटन कौशल्य आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे संस्कार नव्या पिढीच्या मनावर उमटले.
प्रास्ताविक करताना प्रा. अनुप कुलकर्णी यांनी लोकप्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. आमदार अमोल पाटील यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन केले. त्यांनी शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या संशोधनासोबतच सांस्कृतिक जडणघडणीत असलेल्या योगदानाचे मनापासून कौतुक केले.
नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, नागरिक आणि शैक्षणिक संस्था यांनी हातात हात घालून काम करण्याचे आवाहन केले. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा यांवर विशेष भर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
उपनगराध्यक्ष सौ. सुनीता माळी यांनी महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज अधोरेखित केली आणि
समाजकार्यात महिलांची भूमिका अधिक बळकट व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
एस. आर. बापू यांनी आरोग्य, शिक्षण आणि शहरविकास हेच प्रथम कर्तव्य राहील, असा विश्वास दिला. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मोहन शुक्ला यांनी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक संस्थेची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे प्रभावीपणे मांडले. श्री. शालिग्राम गायकवाड यांनी सर्वधर्म समभाव जपत कार्य करणाऱ्या संस्थेचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी एरंडोल शहराच्या प्रगतीसाठी महाविद्यालय सदैव अग्रस्थानी राहील, असे आश्वासन दिले. उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या नियोजनातून हा सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जावेद शेख यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थितांचे ऋण व्यक्त केले.
हा नागरी सत्कार सोहळा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नव्हता; तो एरंडोल शहराच्या सामाजिक ऐक्याचा, शिक्षणाच्या संस्कारांचा आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीचा एक जिवंत पुरावा ठरला. शास्त्री फार्मसी महाविद्यालयाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, शिक्षणसंस्था केवळ ज्ञानदानाचे केंद्र नसून त्या समाजपरिवर्तनाच्या चळवळीचे प्रेरणास्थान असतात.
एरंडोलच्या इतिहासात हा दिवस सदैव अभिमानाने स्मरणात राहील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा