दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याआधी...!
दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याआधी...!
दुसऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या लोकांनी आधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहावे. दुसऱ्याच्या आयुष्यातील चुका शोधताना आपले हात किती मळलेले आहेत, याची त्यांना अनेकदा जाणीव नसते. आजच्या जगात दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे, अफवा पसरवणे, किंवा त्याच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणे इतके सोपे झाले आहे.
एक चुकीचा शब्द, एक तिरकस टिपण किंवा दुर्भावनाशील नजर दुसऱ्याच्या जीवनात खोल जखम करू शकते, पण आपण स्वतःच्या मनातील कटूता, द्वेष आणि मत्सर याची जाणीव ठेवतो का? बहुतेक वेळा आपण हे विसरतो.
चारित्र्य म्हणजे फक्त बाह्य वर्तन नव्हे; ते मनाची शुद्धता, विचारांची प्रामाणिकता आणि कृतीची सातत्यता आहे. जेव्हा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात दोष शोधतो, तेव्हा आपण स्वतःच्या कमतरता लपवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याच्या चुका मोजण्यात रमल्यावर, स्वतःच्या चुका मान्य करण्याचे धैर्य आपण गमावतो.
कधी कधी एखाद्या व्यक्तीची शांतता ही कमजोरी नव्हे, तर संस्कृती असते. तो प्रत्युत्तर देत नाही म्हणून दोषी ठरत नाही. उलट, न बोलता सहन करणाऱ्या मनाची वेदना शब्दांपेक्षा अधिक तीव्र असते. समाजात प्रतिष्ठा गमावणे म्हणजे जिवंतपणी मृत्यू अनुभवण्यासारखे असते. अशा वेळी आधार देण्याऐवजी जर आपणच त्याच्या जखमेवर मीठ चोळत असू, तर आपण माणुसकी हरवत आहोत.
दुसऱ्याची घाण शोधताना आपण स्वतःच्या मनातील अहंकार, द्वेष आणि असुरक्षितता झाकण्याचा प्रयत्न करत असतो. पण सत्य हे आहे की दुसऱ्याला खाली खेचून कोणीही वर जात नाही. दुसऱ्याच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून आपले चारित्र्य मोठे होत नाही; उलट, आपली उंची कमी होते.
माणूस परिपूर्ण नसतो. चुका प्रत्येकाकडून होतात. पण दुसऱ्याच्या चुका सतत उजेडात आणणे, त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला कलंक लावणे ही खरी अन्यायाची कामगिरी आहे. आपण जर थोडी सहानुभूती, थोडे समजून घेणे आणि थोडे प्रेम दाखवले, तर अनेक गैरसमज आपोआप दूर होतील.
खरे चारित्र्य म्हणजे दुसऱ्याच्या गैरहजेरीत ही त्याच्याबद्दल आदराने बोलणे. खरे मोठेपण म्हणजे दुसऱ्याची प्रतिष्ठा जपणे. आणि खरी माणुसकी म्हणजे पडलेल्या माणसाला उचलणे त्याला ढकलणे नव्हे.
म्हणूनच, दुसऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याआधी क्षणभर स्वतःच्या मनाचा आरसा पाहा. स्वतःच्या विचारांची, कृतीची स्वच्छता तपासा. कारण शेवटी, दुसऱ्याची घाण शोधणाऱ्यांचे हातच आधी घाणेरडे होतात आणि फक्त स्वच्छ मनानेच खरे सौंदर्य फुलते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा