गुणदोष दाखवणारे मित्र दैवाची देणगी.....!
गुणदोष दाखवणारे मित्र दैवाची देणगी.....!
मित्र केवळ अलंकाराप्रमाणे आयुष्याच्या गळ्यात शोभून दिसणारे नसावेत. केवळ उपस्थितीने सौंदर्य वाढवणारे, प्रत्येक वेळी आपल्याच बाजूने उभे राहणारे, आपल्या प्रत्येक कृतीला होकार देणारे मित्र खरेच मित्र असतात का, असा प्रश्न कधी तरी मनात डोकावतो. कारण स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतात; पण आरशाप्रमाणे निर्भीडपणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र मात्र दैवानेच लाभतात.
आपल्या यशावर आनंद मानणारे, आपली प्रशंसा करणारे लोक आयुष्यात कमी नसतात. आपल्या शब्दांना टाळ्या मिळतात, आपल्या चुकीला ही समर्थन मिळते. त्या क्षणी मन सुखावते, अहंकार फुलतो. पण हे सुख क्षणभंगुर असते. कारण अशा स्तुतीच्या गर्दीत आपल्याला स्वतःची खरी ओळख होत नाही. आपली चूक, आपली मर्यादा, आपली कमकुवत बाजू अंधारातच राहते.
खरा मित्र मात्र आरशासारखा असतो. आरसा आपल्याला सुंदर दाखवतो, पण चेहऱ्यावरची मळ ही लपवत नाही. तसाच मित्र आपल्यातले चांगले गुण मनापासून कौतुकाने स्वीकारतो, पण दोषही प्रामाणिकपणे दाखवतो. त्याचे शब्द कधी कधी कठोर वाटतात, मनाला बोचतात, पण त्या शब्दांमागे असते निखळ प्रेम आणि आपल्याला योग्य मार्गावर नेण्याची तळमळ.
असा मित्र आपल्याला खूश ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, तर आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करतो. आपण चुकतोय हे सांगताना तो घाबरत नाही, कारण त्याला आपली साथ सोडायची नसते. तो आपल्याशी वाद घालतो, आपल्याला थांबवतो, कधी आपला अहंकार दुखावतो ही. पण त्या प्रत्येक क्षणामागे असते आपल्यासाठीची काळजी, आपल्यावरचा विश्वास.
आयुष्याच्या वाटचालीत असे मित्र दीपस्तंभासारखे असतात. अंधारात दिशा दाखवणारे, चुकीच्या वळणावर सावध करणारे. यशाच्या शिखरावर असताना आपल्याला नम्र राहायला शिकवणारे आणि अपयशाच्या गर्तेत असताना “मी आहे” असे सांगून उभे करणारे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आपण मोठे होतो, परिपक्व होतो, स्वतःला ओळखू लागतो.
म्हणूनच मित्र केवळ अलंकार नसावेत; ते आयुष्याचे शिल्पकार असावेत. स्तुती करणारे मित्र आपल्याला आनंद देतात, पण आरशाप्रमाणे सत्य दाखवणारे मित्र आपले आयुष्य घडवतात. असे मित्र मिळणे हे भाग्य आहे आणि त्यांना जपणे हे आपले सौभाग्य. कारण जे आपल्याला सत्य सांगतात, तेच खऱ्या अर्थाने आपले असतात.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा