दुसऱ्यांच्या अश्रूंवर उभे राहिलेले यश....!

दुसऱ्यांच्या अश्रूंवर उभे राहिलेले यश....!

दुसऱ्यांच्या पराभवाची वाट लावण्यात काही लोकांना एक विचित्र समाधान मिळते. जणू दुसऱ्याला खाली खेचले की आपण आपोआप उंचावतो, अशी त्यांची समजूत असते. परंतु जीवनाचा एक साधा, शांत आणि अटळ नियम आहे.दुसऱ्याची वाट लावताना आपण नकळत स्वतःचीच वाट लावत असतो.

दुसऱ्यांच्या अपयशावर टाळ्या वाजवणारे हात कधीतरी स्वतःच्या डोळ्यांतील अश्रू पुसताना थरथरतात. कारण नियती अत्यंत शांतपणे आपला हिशेब ठेवत असते. आपण कोणाच्या पायात अडथळे टाकतो, कोणाच्या स्वप्नांवर निर्दयपणे पाय देतो, कोणाच्या विश्वासाला तडा देतो. याची प्रत्येक नोंद वेळ आपल्या वहीत करत असते. त्या नोंदी कधी पुसल्या जात नाहीत; त्या योग्य वेळी परतफेडीच्या रूपाने समोर येतात.

दुसऱ्यांच्या आयुष्यात अंधार पसरवणाऱ्याला क्षणभर वाटते.“मी जिंकलो!” परंतु तो हे विसरतो की अंधार पसरवण्यासाठी आधी स्वतःच्या मनात अंधार साठवावा लागतो. आणि ज्या मनात अंधार साचतो, तेथे शांतता, समाधान आणि आनंद हळूहळू नष्ट होऊ लागतात. बाहेरून विजयाचे हास्य असते, पण अंतर्मनात पराभवाची पोकळी दाटलेली असते.

कुणाच्या अपयशाची खिल्ली उडवताना आपण केवळ त्या व्यक्तीचा नव्हे, तर स्वतःच्या माणुसकीचा ही अपमान करीत असतो. कुणाच्या वाटेत काटे पेरताना आपण स्वतःच्या पायाखालची जमीनच खणत असतो. कारण आयुष्य गोल आहे.आज आपण वर असतो, उद्या खाली येण्याची वेळ येऊ शकते. आज आपण हसत असतो; पण उद्या आपल्याला ही कोणाच्या आधाराची, सहानुभूतीची गरज भासू शकते.

खरा विजय दुसऱ्याला पाडण्यात नसतो, तर त्याला उभे करण्यात असतो. दुसऱ्याच्या डोळ्यांत अश्रू आणण्यात नव्हे, तर त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात असतो. स्पर्धा माणसाला पुढे नेत असली तरी सहकार्य त्याला मोठेपण देते. दुसऱ्याला हरवून मिळवलेले यश क्षणभंगुर असते; पण दुसऱ्याला साथ देऊन मिळवलेला सन्मान दीर्घकाळ टिकतो.

मत्सर, द्वेष आणि अहंकार ही अशी बीजे आहेत की ती मनात पेरली तर नात्यांचे वृक्ष कोमेजतात. दुसऱ्यांच्या वेदनेवर उभारलेले यश कधीच स्थिर राहत नाही. आयुष्य हा एक आरसा आहे.आपण जे देतो, तेच परत येते. जर आपण काटे पेरले, तर फुलांची अपेक्षा कशी ठेवणार? आज आपण कोणाच्या वाटेत अडथळे निर्माण केले, तर उद्या आपल्याच मार्गात अडथळे उभे राहणे अपरिहार्य आहे. कर्माचा हिशेब उशिरा का होईना, पण अत्यंत अचूकपणे पूर्ण होतो.

वेळ हा फार मोठा शिक्षक आहे. तो कोणाला ही कायम जिंकू देत नाही आणि कोणाला ही कायम हरवू देत नाही. परंतु तो प्रत्येकाला त्यांच्या कृतींची जाणीव करून देतो. आज जो इतरांची वाट लावत फिरतो, तोच कधी तरी एकाकी उभा राहतो.आधारा शिवाय, विश्वासा शिवाय, नात्यांशिवाय. आणि तेव्हा त्याला उमगते की क्षणिक आनंदासाठी त्याने किती मौल्यवान गोष्टी गमावल्या.

म्हणून थांबूया… क्षणभर अंतर्मुख होऊया.दुसऱ्यांच्या आयुष्यात अंधार पसरवण्या ऐवजी एक दिवा लावण्याचा प्रयत्न करूया.दुसऱ्याच्या अपयशावर हसण्या ऐवजी त्याच्या प्रयत्नांना दाद देऊया.

कारण जीवन फार मोठे नाही; पण कर्माचे वर्तुळ अत्यंत अचूक आहे.दुसऱ्यांची वाट लावत लावत कधीतरी आपलीच वाट लागू नये, ही जाणीव वेळेआधी झाली, तरच आपण खऱ्या अर्थाने जिंकू.

शेवटी, उंच होण्याचे दोन मार्ग असतात.एक, दुसऱ्याला पाडून स्वतःला वर समजण्याचा;आणि दुसरा, दुसऱ्याला हात देऊन दोघांनीही उंचावण्याचा.निवड आपली आहे.कारण खरे मोठेपण पराभव घडवण्यात नसते, तर मन जिंकण्यात असते.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

API दिपक पाटील यांची यशोगाथा....