दुसऱ्याचे वाईट चिंतिणाऱ्याचे कधीही चांगले होत नाही…!
दुसऱ्याचे वाईट चिंतिणाऱ्याचे कधीही चांगले होत नाही…!
या जगात प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याची वाट चालत असतो.कोणी वेगाने, कोणी सावकाश; कोणी प्रकाशात, तर कोणी अंधारातून वाट काढत. पण या सगळ्या प्रवासामागे एक अदृश्य सूत्र कार्यरत असते कर्माचे. हे सूत्र नजरेला दिसत नाही, पण जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याची जाणीव होत राहते.
कधी कधी मनात मत्सराची एक हलकीशी ठिणगी पडते. दुसऱ्याचे यश डोळ्यांना खुपते, त्याचे हसू अस्वस्थ करते. आणि मग नकळत आपण त्याच्या वाटेवर काटे टाकायला सुरुवात करतो. शब्दांनी, कृतींनी किंवा विचारांनी त्याच्या आयुष्यात दुःखाचे ढग जमवतो. त्या क्षणी वाटते.“आता मी वरचढ ठरलो.” पण खरेच का?
दुसऱ्याच्या पायाखालची जमीन सरकवून आपण स्वतः आकाशाला स्पर्श करू शकत नाही. कारण ज्याच्या मनात द्वेष भरलेला आहे, त्याच्या आयुष्यात शांती कशी नांदेल? दुसऱ्याला रडवून मिळणारा आनंद हा क्षणिक असतो.जणू वाळवंटात दिसणारे पाण्याचे मृगजळ. ते जवळ गेल्यावर केवळ रिकामेपणाच हातात येतो.
द्वेषाची आग इतरांना जाळण्याआधी स्वतःच्या मनाला भस्म करते. अशा माणसाच्या चेहऱ्यावर हास्य असले तरी ते मनापासून नसते. कारण अंतर्मनात अपराधाची एक सावली सतत वावरत असते. ती सावली त्याला कधीच निवांत झोपू देत नाही, कधीच समाधानाने जगू देत नाही.
सृष्टीचा नियम अत्यंत न्यायी आहे. तो कोणावरही अन्याय करत नाही, पण कुणालाही वाचवतही नाही. तुम्ही जर दुसऱ्याच्या आयुष्यात अंधार पसरवला, तर तुमच्या आयुष्यात प्रकाश कसा टिकेल? कारण जीवन हा आरसा आहे.तुम्ही जसे भाव त्यात ठेवता, तसाच तो परत तुमच्याकडे दाखवतो.
खरे सुख दुसऱ्याच्या हसण्यात असते. दुसऱ्याच्या यशात टाळ्या वाजवण्यात असते. एखाद्याच्या संकटात आधार देण्यात असते. जेव्हा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा किरण बनतो, तेव्हा आपल्या आयुष्यातही आनंदाची पहाट उगवते. पण जेव्हा आपण इतरांचे नुकसान करतो, तेव्हा आपल्या नशिबातही अंधाराचे ढग दाटू लागतात.
समृद्धी ही पैशात नसते; ती मनाच्या शांततेत असते. आणि शांतता त्या मनातच वसते, जे इतरांसाठी सद्भावनेने भरलेले असते. म्हणूनच, दुसऱ्याचे वाईट चिंतिण्याऐवजी त्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. दुसऱ्याच्या वाटेवर अडथळे आणण्याऐवजी त्याच्या हातात हात द्या.
कारण शेवटी, जीवन आपल्याला एकच सत्य शिकवते.
दुसऱ्याचे वाईट चिंतिणाऱ्याचे कधीही चांगले होत नाही.
जर जगात उजेड हवा असेल, तर स्वतः दीप बना. कारण दीप इतरांसाठी जळतो, पण त्याच्या प्रकाशाने त्याचे स्वतःचे अस्तित्वही उजळून निघते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा