हट्ट फक्त आईपाशीच शोभतो….!


हट्ट फक्त आईपाशीच शोभतो….!

कदाचित हे वाक्य ऐकताना मनाला थोडं टोचेल. पण आयुष्याच्या वळणावर उभं राहून मागे वळून पाहिलं, तर जाणवतं.हट्ट करण्याचा खरा अधिकार फक्त आईपाशीच असतो.

लहानपणी आपण किती सहज हट्ट करायचो! खेळणी हवीत, चॉकलेट हवं, नवीन कपडे हवेत, किंवा फक्त तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे.हट्टाला कारण लागत नव्हतं. आणि गंमत म्हणजे, आईला ही आपल्या त्या हट्टाचा कधी कंटाळा आला नाही. उलट आपल्या हट्टात तिला आपलं बालपण दिसायचं, आपलं निरागस प्रेम दिसायचं.

आईपाशी हट्ट करताना आपल्याला कधी भीती वाटत नाही. कारण आपल्याला ठाऊक असतं.ती आपल्याला नाकारत नाही. ती रागावली तरी तिच्या रागातही माया असते. ती नाही म्हणाली, तरी त्या “नाही”मध्ये आपलं भलं दडलं असतं. तिच्यासमोर आपण स्वतःला पूर्णपणे मोकळं करू शकतो.कमकुवतपणा, रडणं,रुसणं सगळं.
पण जसजसं आपण मोठे होतो, तसतसं जग बदलतं. 

नात्यांचे अर्थ बदलतात. प्रत्येक गोष्ट पैशाने, प्रतिष्ठेने, स्वार्थाने मोजली जाते. अशा जगात जर आपण हट्ट केला, तर लोक त्याला निरागसतेचा भाग मानत नाहीत; ते त्याला मागणं समजतात… आणि मागणं म्हणजे भिकारीपण, अशी त्यांची धारणा असते.

इतरांकडे हट्ट केला, तर लोक आपल्याला समजून घेतीलच असं नाही. ते आपल्या गरजेकडे पाहतात, पण आपल्या भावनेकडे नाही. त्यांना आपली अपेक्षा दिसते, पण आपला विश्वास दिसत नाही. आणि मग एका क्षणी आपणच स्वतःला प्रश्न विचारतो.आपण इतके परावलंबी आहोत का?

खरं तर हट्ट हा स्वार्थ नसतो. हट्ट हा विश्वासाचा दुसरा चेहरा असतो. आपण जिथे हट्ट करतो, तिथे आपल्याला खात्री असते की समोरचा आपल्याला सोडून जाणार नाही. आई हे त्या विश्वासाचं शाश्वत प्रतीक आहे. तिच्या प्रेमाला अट नसते, सीमा नसते, अपेक्षा नसतात. म्हणूनच तिच्यापाशी केलेला हट्ट कधी भिकारीपण वाटत नाही.तो प्रेमाचा हक्क वाटतो.

आईच्या कुशीत आपण राजा असतो. तिच्या डोळ्यांत आपण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो. म्हणून तिच्यापाशी केलेली मागणी ही भिक नसते; ती आपुलकीची परंपरा असते. ती आपल्याला देताना स्वतःला कमी करत नाही, उलट समृद्ध करत असते.

जगात प्रत्येक नातं काही ना काही अपेक्षांवर उभं असतं. पण आईचं नातं फक्त प्रेमावर उभं असतं. म्हणूनच कदाचित हट्ट फक्त तिच्याचपाशी शोभतो. कारण तिच्या हृदयात आपल्या हट्टासाठी नेहमीच जागा असते.

आज आपण मोठे झालो आहोत. स्वावलंबी झालो आहोत. पण कधीतरी थकलो, हरलो, तुटलो… तर मन पुन्हा त्या जुन्या दारावर जाऊन थांबतं आईच्या दारावर. कारण तिथे हट्ट करण्यासाठी परवानगी लागत नाही; तिथे फक्त प्रेम लागतं.

म्हणूनच आयुष्यभर जर कुठे हट्ट करायचा असेल, तर तो आईपाशीच करा. कारण जग तुमच्या हट्टाला भिक समजेल, पण आई त्याला प्रेम समजेल… आणि प्रेम कधीच भिक नसतं. 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !