कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.....!
कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.....!
“कोणाचं वाईट करून आपलं भलं होईल हा विचार कधीच करू नका; कारण निसर्ग नेहमी व्याजासह परत करतो… चांगुलपणाची बीजे पेरा, आयुष्यात सुख नक्कीच उगवेल. कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.”
ही वचने केवळ उपदेश नसून जीवनाचा गूढ आणि गाभा उलगडणारा शाश्वत नियम आहेत. मानवी जीवनाच्या प्रवासात आपण अनेकदा तात्पुरत्या लाभाच्या मोहात अडकतो. यश, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांच्या धावपळीत कधी नकळत इतरांच्या भावनांना ठेच पोहोचवतो, कुणाला कमी लेखतो, तर कुणाच्या वाटेत अडथळे निर्माण करतो. त्या क्षणी आपल्याला वाटते की आपण जिंकलो; परंतु हे आपण विसरतो की प्रत्येक कृतीची सावली आपल्यामागेच असते. निसर्गाच्या लेखावहीत प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती नोंदली जाते. त्या वहीत पुसण्याची सोय नसते; तेथे बदलाची शाई नसते.
आज आपण जे पेरतो, तेच उद्या आपल्या आयुष्यात उगवते.फरक फक्त काळाचा असतो. शेतकरी जसा बी पेरताना जागरूक असतो, तसाच विवेक आपल्या कृतीत असणे आवश्यक आहे. तो कधीच काटेरी झाडाचे बी पेरून गोड फळांची अपेक्षा करत नाही. मग आपण मत्सर, द्वेष, कपट आणि फसवणूक यांची बीजे पेरून प्रेम, समाधान आणि यशाची अपेक्षा कशी करू शकतो?
जीवन ही एक सुपीक भूमी आहे. त्या भूमीत आपण प्रेम, सहानुभूती, प्रामाणिकपणा, करुणा आणि मदतभाव यांची बीजे पेरली, तर त्यातून आनंदाचे आणि समाधानाचे हिरवेगार पीक उगवते. एखाद्याला दिलेला धीराचा हात, संकटात केलेली निःस्वार्थ मदत, मनापासून उच्चारलेला आपुलकीचा शब्द ही सारी आपल्या कर्मभूमीत पेरलेली सुवर्णबीजे आहेत. त्यांचे फळ त्वरित मिळाले नाही, तरी ते नष्ट होत नाही; योग्य काळ येताच ते परत येते आणि ते ही व्याजासह.
निसर्गाचा नियम अत्यंत साधा आहे. प्रतिसादाचा आपण डोंगरात जसा आवाज देतो, तसाच प्रतिध्वनी परत येतो. आपण जर कटुता पेरली, तर कटुतेचेच काटे उगवतात; आपण जर प्रेम पेरले, तर प्रेमाचीच फुले फुलतात. म्हणूनच “कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.” आपण लिहिलेला प्रत्येक शब्द आणि केलेली प्रत्येक कृती त्या पाटीवर कोरली जाते. चांगुलपणाची अक्षरे उमटवली, तर जीवनाची पाने सुंदर होतात; वाईटाचे ठसे उमटवले, तर तीच पाने मलिन होतात.
कधी कधी असे भासते की चांगुलपणाचा उपयोग नाही. आपण प्रामाणिक राहतो, तरी संकटे येतात; आपण मदत करतो, तरी तात्काळ परतफेड होत नाही. त्या क्षणी मन खिन्न होते. परंतु निसर्गाची गती शांत आणि संयमी असते. तो अन्याय करत नाही; तो योग्य क्षणाची प्रतीक्षा करतो. एखाद्या अनपेक्षित वळणावर मिळालेली साथ, अडचणीच्या वेळी लाभलेली मदत, किंवा अचानक प्राप्त झालेली संधी ही सर्व आपल्या पूर्वीच्या सद्भावनेचीच परतफेड असते.
वाईट करणे क्षणिक असते, परंतु त्याचे परिणाम दीर्घकाळ वेदना देतात. उलट, चांगुलपणाची बीजे पेरण्यासाठी संयमाची मशागत करावी लागते; परंतु त्याचे झाड सावली देणारे, फळे देणारे आणि इतरांना ही आनंद देणारे असते. कुणाच्या दुःखावर उभारलेले यश कधीच समाधान देत नाही; परंतु प्रामाणिक प्रयत्नांवर उभारलेले यश चिरस्थायी आणि मंगल असते.
म्हणून चला, आपण ठाम निश्चय करूया यशासाठी कुणाला पाडायचे नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाने उभे राहायचे. कुणाच्या डोळ्यांत अश्रू आणून नव्हे, तर त्यांच्या ओठांवर हास्य फुलवून जीवन जगायचे. कारण जीवनाचा अटळ नियम एकच आहे.“पेराल ते उगवत.”
आज आपल्या मनाच्या शेतात सद्भावनेची, प्रेमाची आणि प्रामाणिकतेची बीजे पेरूया. उद्या त्याच शेतात सुख, शांती आणि समाधानाची हिरवीगार पिके डोलताना दिसतील. तेव्हा उमगेल कर्माचा नियम कठोर असला, तरी तो न्याय्य आहे; कारण आपण जे पेरतो, तेच आपल्या आयुष्यात भरभरून उगवते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा