चारित्र्याची उंची आणि आरोपांची नीचता...!


चारित्र्याची उंची आणि आरोपांची नीचता...!

समाजात काही व्यक्ती अशा असतात की ज्यांचं आयुष्य एखाद्या स्वच्छ झऱ्यासारखं निर्मळ, पारदर्शक आणि पवित्र असतं. त्यांचा स्वभाव सोज्वळ, वर्तन शिस्तबद्ध आणि विचार उदात्त असतात. त्यांच्या सहवासाने मन प्रसन्न होतं, कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रामाणिकतेचा सुगंध आणि सत्यतेचं तेज दडलेलं असतं. त्या कोणाचंही वाईट चिंतत नाहीत, कोणाच्या मार्गात अडथळे आणत नाहीत; उलट इतरांच्या जीवनात प्रकाश फुलवण्याचं कार्य करत असतात.

परंतु नियतीची एक वेदनादायी विडंबना अशी की, याच चारित्र्यसंपन्न व्यक्तींवर अनेकदा चरित्रहीनतेचे शिंतोडे उडवले जातात. त्यांच्या शुद्ध आचरणावर संशयाची सावली टाकली जाते. हे शिंतोडे केवळ शब्दांचे नसतात; ते मनाला जखम करणारे, आत्म्याला टोचणारे असतात. एखाद्याच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करणं म्हणजे त्याच्या अस्तित्वालाच हादरा देणं होय.

याला नेमकं काय म्हणावं?
ही केवळ चिखलफेक नाही.ही मत्सराची कडवट प्रतिक्रिया आहे.ही मानसिक दिवाळखोरी आहे.
ही दुष्ट प्रवृत्तीची विकृत आनंदलालसा आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती निस्वार्थ भावनेने, निष्ठेने आणि सत्यतेने समाजात उभी राहते, तेव्हा तिचं तेज काहींना असह्य होतं. स्वतःच्या अंधारात जगणाऱ्यांना दुसऱ्याचा प्रकाश डोळे दिपवणारा वाटतो. त्यामुळे ते त्या प्रकाशाला मलीन करण्याचा प्रयत्न करतात.अफवा पसरवून, खोटे आरोप करून, गैरसमज निर्माण करून. त्यांच्या मनातील हीनतेला झाकण्यासाठी ते दुसऱ्याच्या चारित्र्यावर डाग लावण्याचा प्रयत्न करतात.

परंतु चारित्र्यसंपन्न व्यक्ती या सर्वांच्या पलीकडे उभी असते. आरोपांच्या वादळात तिचं मन हेलावलं तरी ती कोसळत नाही. कारण तिच्या पायाभरणीत सत्याची भक्कम वीट असते.तिच्या अंतःकरणात आत्मविश्वासाचा दीप प्रज्वलित असतो. तिला ठाऊक असतं की सत्याला वेळ लागू शकतो, परंतु ते कधीही पराभूत होत नाही.

इतिहास याचाच साक्षीदार आहे. संत, समाजसुधारक आणि अनेक थोर व्यक्तिमत्त्वांनाही अशा अपप्रचारांचा सामना करावा लागला. त्यांच्या कार्यावर, त्यांच्या निष्ठेवर शंका उपस्थित करण्यात आली. तरीही काळाच्या कसोटीवर त्यांचं चरित्र सोन्यासारखं उजळून निघालं, आणि आरोप करणाऱ्यांची नावं काळाच्या पडद्याआड लुप्त झाली. कारण असत्याचा गजर क्षणभंगुर असतो, तर सत्याची पावलं धीमी पण अढळ असतात.

चारित्र्यावर होणारे वार तलवारीपेक्षा तीव्र असतात. ते शरीराला नव्हे, तर मनाला जखम करतात. त्या वेदना खोल आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात. तरीही ज्या व्यक्तीच्या अंतरात्म्यात सत्याची शक्ती असते, ती या वेदनांवर मात करते. कारण कमळ चिखलात उगवतं, पण चिखल त्याच्या पवित्रतेला कलंकित करू शकत नाही; उलट त्याची शोभाच अधिक खुलून दिसते.

समाजाने मात्र स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा आपण सत्याच्या बाजूने उभे राहणार आहोत की अफवांच्या प्रवाहात वाहत जाणार आहोत? आपण कोणाच्या शब्दांवर विश्वास ठेवतो.दुष्ट प्रवृत्तीच्या आरोपांवर, की चारित्र्यसंपन्न आयुष्याच्या साक्षीवर?

एखाद्याच्या चारित्र्यावर डाग लावणं सोपं असतं; पण त्या डागांच्या वेदना समजून घेणं कठीण असतं. म्हणूनच या प्रवृत्तीला नाव द्यायचं झालं तर ते एकच “स्वतःच्या हीनतेचा मुखवटा.” कारण जो स्वतःच्या आयुष्यात समाधान, मूल्य आणि नैतिकतेचा अभाव अनुभवतो, तोच दुसऱ्याच्या स्वच्छ आरशावर धूळ फेकण्याचा प्रयत्न करतो.

शेवटी एक गोष्ट नक्की दगड नेहमी फळांनी भरलेल्या झाडालाच मारले जातात. चारित्र्यसंपन्न व्यक्तींवर झालेले आरोप हे त्यांच्या पतनाचे नव्हे,तर त्यांच्या उंचीचे द्योतक असतात.काळ हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे; तो कधीही अन्याय करत नाही.

म्हणून सत्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी शांतपणे, ठामपणे आणि न डगमगता पुढे चालत राहावं. कारण जेव्हा वादळ शांत होतं,तेव्हा आकाश अधिक निर्मळ दिसत आणि तेव्हा सत्याचा सूर्य पुन्हा एकदा तेजाने उगवतो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

API दिपक पाटील यांची यशोगाथा....