मातीच्या सुगंधातून उभा राहिलेला सुवर्णवीर नीरज दिलीप चौधरी....!


मातीच्या सुगंधातून उभा राहिलेला सुवर्णवीर नीरज दिलीप चौधरी....!

धुळे जिल्ह्यातील वलवाडी या छोट्याशा गावात जन्मलेले नीरज दिलीप चौधरी हे नावाने साधे, पण कर्तृत्वाने विलक्षण आहेत. गरीब व शेतकरी कुटुंबात वाढताना त्यांनी कष्टांचे मोल लहानपणापासूनच जाणले. उन्हातान्हात शेतात राबणारे आई-वडील, मर्यादित साधनसामग्री आणि साधे राहणीमान परंतु मनात मात्र मोठी स्वप्ने आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची अढळ जिद्द होती.
लहानपणापासूनच त्यांना खेळाची विशेष आवड होती. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी मैदानात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. राज्यस्तरावर खेळताना त्यांनी तब्बल दहा पदके मिळवली. प्रत्येक पदक हे त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि कुटुंबाच्या त्यागाचे प्रतीक होते. गावच्या मातीत वाढलेला हा खेळाडू स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यशाची शिखरे सर करू लागला.

त्यांची झेप केवळ राज्यापुरती मर्यादित राहिली नाही. देशाचे प्रतिनिधित्व करत परदेशात खेळताना त्यांनी भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आणि पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले. त्या ऐतिहासिक क्षणी वलवाडी गाव, धुळे जिल्हा आणि संपूर्ण समाज अभिमानाने भारावून गेला. गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा आज देशाचा मान वाढवणारा खेळाडू ठरला होता.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना प्रतिष्ठेचा शिव छत्रपती पुरस्कार प्रदान केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारताना त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दाटले होते. पुढे शासनाने त्यांची पुणे येथे सहाय्यक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली. हा त्यांच्या परिश्रमांचा आणि गुणवत्तेचा सन्मानच म्हणावा लागेल.
मोठ्या शहरात जाऊनही त्यांनी आपल्या मुळांचा विसर पडू दिला नाही. यशाच्या शिखरावर पोहोचूनही त्यांचे पाय आजही मातीतच घट्ट रोवलेले आहेत. सत्कार समारंभात टाळ्यांचा कडकडाट होत असताना ही ते नम्रपणे उभे राहतात आणि आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना, गुरुजनांना व गावच्या संस्कारांना देतात.

पिंपरी येथील आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कामधेनू गोशाळेचे व संस्थेचे संचालक प्रमोदभाऊ चौधरी, संचालिका सौ.रत्ना चौधरी, संस्थेचे सचिव विनोद चौधरी, मुख्याध्यापिका सौ. वैशाली चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते. शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सन्मानित होताना त्यांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू हा क्षण किती भावनिक होता, याची साक्ष देत होते. तो क्षण केवळ त्यांच्या आयुष्यातील नव्हे, तर संपूर्ण गावासाठी अभिमानाचा ठरला.

सत्कारानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले,“खेळ म्हणजे केवळ पदक नव्हे; तो आयुष्य घडवणारा गुरू आहे. मेहनत, शिस्त आणि चिकाटी असेल तर कोणतीही अडचण अडथळा ठरत नाही.”

त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांच्या मनात नवी उमेद निर्माण झाली. अनेकांच्या डोळ्यांत नवी स्वप्ने उजळली आणि मनात यशाची ठाम इच्छा प्रज्वलित झाली.

नीरज दिलीप चौधरी यांची कहाणी ही संघर्षातून उभ्या राहिलेल्या यशाची जिवंत साक्ष आहे. खेड्यातील साध्या घरातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राज्यस्तरीय सन्मानापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी आपल्या कुटुंबाचे, गावाचे, जिल्ह्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

त्यांच्या जिद्दीला, परिश्रमांना आणि विनम्रतेला मनःपूर्वक सलाम! 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !