अपेक्षांच्या ओझ्यात दबलेली स्वप्नं....!

अपेक्षांच्या ओझ्यात दबलेली स्वप्नं....!

असं म्हणतात की सगळ्यांना खुश ठेवणारा माणूस कधीच खऱ्या अर्थाने पुढे जात नाही. कारण तो स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने चालत नसतो; तो लोकांच्या अपेक्षांच्या मागे धावत असतो. त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू स्वतः नसतो, तर इतरांच्या भावना, त्यांची मते आणि त्यांचा आनंद असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलावं यासाठी तो झटत राहतो, पण त्याच वेळी स्वतःच्या डोळ्यातले अश्रू मात्र शांतपणे लपवत राहतो.

अशा माणसाला “नाही” म्हणणं जमत नाही. त्याला भीती वाटते.कुणी रुसू नये, कुणी दूर जाऊ नये, कुणाला वाईट वाटू नये. तो नात्यांना जपण्याच्या प्रयत्नात स्वतःलाच विसरतो. सुरुवातीला त्याची ही सवय सगळ्यांना आवडते. लोक त्याचं कौतुक करतात. “किती समजूतदार आहेस!”, “तू नसतास तर काय झालं असतं!”, “तुझ्यासारखा कोणी नाही!” असे शब्द त्याच्या मनाला समाधान देतात. त्याला वाटतं की तो खरोखरच महत्त्वाचा आहे.

परंतु हळूहळू हेच कौतुक अपेक्षांमध्ये बदलतं. अपेक्षा हक्कांमध्ये रूपांतरित होतात. लोकांना त्याचा होकार सवयीचा होतो. त्याची उपलब्धता गृहीत धरली जाते. त्याच्या वेळेची, त्याच्या भावनांची, त्याच्या स्वप्नांची किंमत कमी होत जाते. कारण तो स्वतःच स्वतःची किंमत ठरवत नाही.

तो स्वतःच्या इच्छा दाबतो, मतं गिळून टाकतो, स्वप्नांवर पडदा टाकतो. “मी नाही केलं तर कोण करेल?” या भावनेतून तो सतत इतरांसाठी झटत राहतो. पण या धडपडीत तो स्वतःपासून दूर जातो. त्याच्या आयुष्यात मित्र, कुटुंब, नाती सगळं काही असतं.पण त्या सगळ्यात तो स्वतः मात्र हरवलेला असतो.

एक दिवस असा येतो, जेव्हा तो आरशात स्वतःकडे पाहतो आणि स्वतःलाच विचारतो.“मी नक्की कोण आहे?” त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नसतं. कारण तो इतका काळ इतरांसाठी जगत असतो, की स्वतःसाठी जगायचं कसं हेच विसरतो.

जेव्हा तो पहिल्यांदा “नाही” म्हणायचा प्रयत्न करतो, तेव्हा लोकांना तो बदललेला वाटतो. काहींना तो स्वार्थी वाटतो, काहींना कठोर.“तू आधीसारखा राहिला नाहीस” असंही ऐकावं लागतं. पण खरं पाहिलं तर तो बदललेला नसतो; तो फक्त स्वतःकडे परत येत असतो.

सगळ्यांना खुश ठेवणं हे चांगुलपणाचं लक्षण नाही; अनेकदा ते भीतीचं लक्षण असतं.एकटं पडण्याची भीती, नाकारलं जाण्याची भीती, प्रेम कमी होईल या भीतीची. पण खरं प्रेम तुमच्या सततच्या होकारावर टिकत नाही; ते तुमच्या “नाही”लाही स्वीकारतं. ज्या नात्यांना तुमचा स्वाभिमान मान्य आहे, तीच नाती खरी असतात.

स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. मर्यादा आखणं म्हणजे उद्धटपणा नाही. उलट, स्वतःची किंमत ओळखणं हीच आयुष्य पुढे नेण्याची खरी सुरुवात असते. कारण जे कायम सहज उपलब्ध असतं, त्याची किंमत कमी होत जाते.आणि जो स्वतःलाच सतत कमी लेखतो, त्याला जगही तसंच पाहू लागतं.

कदाचित तुम्ही स्वतःसाठी उभं राहिलात तर काही लोक दूर जातील. पण जे राहतील, ते तुम्हाला “माणूस” म्हणून स्वीकारतील फक्त “सोयीचा माणूस” म्हणून नाही.

शेवटी, लोकांच्या अपेक्षा कधीच संपणार नाहीत. पण तुमचं आयुष्य मर्यादित आहे. म्हणून सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. स्वतःला जपा, स्वतःची स्वप्नं जपा, स्वतःच्या मनाचा आदर करा.

कारण सगळ्यांच्या मनात राहणं इतकं महत्त्वाचं नाही, जितकं स्वतःच्या मनात टिकून राहणं महत्त्वाचं आहे. सगळ्यांना खुश ठेवणारा माणूस कदाचित लोकांच्या आठवणीत राहील.पण जर तो स्वतःच्या मनातून हरवला, तर तीच त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी हानी ठरेल. 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !