“प्रतिष्ठित” व्यक्तीपेक्षा “चारित्र्यसंपन्न” व्यक्ती नेहमीच श्रेष्ठ ठरते....! खान्देश माझा
“प्रतिष्ठित” व्यक्तीपेक्षा “चारित्र्यसंपन्न” व्यक्ती नेहमीच श्रेष्ठ ठरते....!
मानवी जीवनात “प्रतिष्ठा” आणि “चारित्र्य” या दोन संकल्पना नेहमीच चर्चेत असतात. समाजात अनेकदा एखाद्या व्यक्तीकडे संपत्ती, सत्ता, पद किंवा प्रसिद्धी असेल, तर त्याला प्रतिष्ठित मानले जाते. लोक त्याला सन्मान देतात, त्याचे कौतुक करतात आणि त्याच्या भोवती एक वेगळे वलय निर्माण होते. पण या बाह्य प्रतिष्ठेच्या मागे त्या व्यक्तीचे खरे व्यक्तिमत्त्व किती स्वच्छ, प्रामाणिक आणि नितळ आहे, याचा विचार मात्र फार थोडे लोक करतात. म्हणूनच माणसाची खरी उंची त्याच्या प्रतिष्ठेने नव्हे, तर त्याच्या चारित्र्याने मोजली जाते.
चारित्र्य ही माणसाची खरी ओळख असते. ते कोणत्या ही पदावर, पैशावर किंवा प्रसिद्धीवर अवलंबून नसते. चारित्र्य म्हणजे प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा, नम्रता आणि माणुसकी यांचे सुंदर मिश्रण. ही मूल्ये माणसाला घरातील संस्कारांमधून, आई-वडिलांच्या शिकवणीतून आणि आयुष्यातील अनुभवातून मिळतात. त्यामुळे चारित्र्य ही अशी संपत्ती आहे जी कुणाकडून मागून मिळत नाही आणि पैशाने विकतही घेता येत नाही. ती माणसाच्या अंतःकरणातून उमललेली असते.
चारित्र्यसंपन्न माणूस म्हणजे तो जो परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्याचा मार्ग सोडत नाही. तो कोणाच्याही हक्कावर डल्ला मारत नाही, कोणाला ही फसवत नाही आणि आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड करत नाही. त्याचे आयुष्यच प्रामाणिकपणाचे आणि माणुसकीचे उदाहरण असते. म्हणूनच अशा व्यक्तीवर समाजाचा विश्वास असतो आणि त्याच्या शब्दाला एक वेगळे वजन असते.
याच्या उलट प्रतिष्ठा अनेकदा परिस्थितीनुसार मिळते. एखाद्या व्यक्तीकडे पैसा असेल, सत्ता असेल किंवा लोकांना त्याच्याकडून काही लाभ मिळत असेल, तर लोक त्याला मान देतात, त्याचे कौतुक करतात. पण परिस्थिती बदलली की ती प्रतिष्ठा देखील हळूहळू कमी होऊ लागते. कारण ती इतरांनी दिलेली असते. लोकांच्या गरजा, स्वार्थ किंवा अपेक्षा संपल्या की ती प्रतिष्ठा ही कमी होत जाते. त्यामुळे प्रतिष्ठा ही क्षणभंगुर असते.
परंतु चारित्र्यसंपन्न व्यक्तीची किंमत काळाच्या ओघात कधीही कमी होत नाही. तो मोठ्या पदावर नसला, तरी लोकांच्या हृदयात त्याला आदराचे स्थान मिळते. अशा व्यक्तींचे जीवन इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. त्यांच्या चांगुलपणाची जाहिरात कधी मोठ्या आवाजात होत नाही, पण त्यांच्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा सुगंध समाजात शांतपणे दरवळत राहतो.
इतिहास साक्ष देतो की अनेक प्रतिष्ठित लोक काळाच्या ओघात विस्मरणात गेले. पण ज्यांनी आपले चारित्र्य जपले, ज्यांनी सत्य, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा मार्ग कधीही सोडला नाही.त्यांची आठवण मात्र लोकांच्या मनात कायम जिवंत राहते. कारण चारित्र्य ही अशी संपत्ती आहे जी काळ, परिस्थिती किंवा पद बदलले तरी कधीच कमी होत नाही.
म्हणूनच आयुष्यात प्रतिष्ठा मिळवण्यापेक्षा चारित्र्य जपणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठा ही लोकांच्या नजरेत असते, पण चारित्र्य हे माणसाच्या आत्म्यात असते. प्रतिष्ठा हरवू शकते, पण चारित्र्य टिकले तर माणूस खऱ्या अर्थाने महान ठरतो.
शेवटी एकच सत्य उरते.प्रतिष्ठा माणसाला लोकांसमोर मोठे दाखवते,पण चारित्र्य माणसाला खऱ्या अर्थाने महान बनवते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा