तलाठी आणि नागरिक फोनमधील गैरसमज....!

तलाठी आणि नागरिक फोनमधील गैरसमज....!

तलाठी हा गावाच्या प्रशासनाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो. सामान्य नागरिकांच्या अडचणी, शंका आणि कागदपत्रांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठीच त्यांची नेमणूक झालेली असते. मात्र, अनेकदा असे दिसून येते की एखाद्या नागरिकाने आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी तलाठी साहेबांना फोन लावला, तर त्यावरून गैरसमज निर्माण होतात आणि काही वेळा तलाठी महाशय नाराज ही होतात. या मागील कारणांचा विचार केला तर एक वेगळाच भावनिक पैलू समोर येतो.

गावातील शेतकरी, कष्टकरी किंवा सामान्य माणूस आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून जेव्हा तलाठी साहेबांना फोन करतो, तेव्हा त्याच्या मनात फक्त एकच अपेक्षा असते.आपल्या प्रश्नाचे समाधान मिळावे. त्याला शासनाच्या नियमांची, प्रक्रियेची फारशी माहिती नसते. त्यामुळे तो थेट संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधतो. परंतु दुसऱ्या बाजूला, तलाठी साहेबांवर ही कामाचा प्रचंड ताण असतो. एकाच वेळी अनेक गावे, नोंदी, अहवाल, आणि शासनाच्या विविध योजना यांचा भार त्यांच्या खांद्यावर असतो.

अशा परिस्थितीत सतत येणारे फोन, वारंवार विचारले जाणारे तेच प्रश्न, किंवा काही वेळा अयोग्य वेळेला केलेला संपर्क यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. ही नाराजी व्यक्त होत असली तरी त्यामागे राग नसून कामाचा ताण, थकवा आणि मर्यादित वेळ यांचीच छाया असते.

ही परिस्थिती समजून घेणे दोन्ही बाजूंनी तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांनी शक्यतो कार्यालयीन वेळेतच संपर्क साधावा, आवश्यक माहिती आधी गोळा करूनच प्रश्न विचारावा. तर तलाठी महाशयांनी ही नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन संयमाने मार्गदर्शन करावे. कारण शेवटी दोघांचे ही उद्दिष्ट एकच आहे.गावाचा विकास आणि लोकांचे समाधान.

ही छोटीशी समजूत आणि परस्पर सहकार्य जर निर्माण झाले, तर कोणताही फोन रागाचे कारण ठरणार नाही, तर तो विश्वास आणि संवादाचा सेतू बनेल.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !