अंधश्रद्धेच्या सावटाखाली हरवलेला विवेक....!
अंधश्रद्धेच्या सावटाखाली हरवलेला विवेक....!
आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि अनिश्चिततेने भरलेल्या जगात माणूस बाहेरून जितका प्रगत दिसतो, तितकाच तो आतून अस्थिर होत चालला आहे. यश, पैसा, प्रतिष्ठा सगळं काही पटकन हवं आहे. थांबायचं नाही, वाट पाहायची नाही, संघर्ष करायचा नाही… पण यश मात्र निश्चित हवं. आणि या अधीरतेतूनच जन्म घेतो एक धोकादायक मार्ग अंधश्रद्धेचा.
जेव्हा आयुष्य आपल्या मनासारखं घडत नाही, तेव्हा माणूस कारणं शोधू लागतो. "माझ्या बरोबरच असं का?" या प्रश्नाचं उत्तर शोधताना तो स्वतःकडे पाहण्या ऐवजी बाहेर उपाय शोधतो. आणि तिथेच त्याची भेट होते भोंदूगिरीशी. सुरुवातीला सगळं खूप साधं वाटतं गोड बोलणं, विश्वास देणं, "सगळं ठीक होईल" असं सांगणं. पण हळूहळू या गोड बोलण्यात भीती मिसळते. "तुमच्यावर संकट आहे", "कोणी तरी वाईट केलं आहे", "उशीर झाला तर सगळं हातातून जाईल"अशा वाक्यांनी माणसाच्या मनावर भीतीचं सावट पसरवलं जातं.
भीती ही माणसाची सर्वात मोठी कमकुवत बाजू आहे. आणि जेव्हा भीती मनावर राज्य करू लागते, तेव्हा विवेक मागे पडतो. अशा वेळी माणूस कोणता ही विचार न करता, कोणत्या ही किमतीवर "उपाय" शोधू लागतो. आणि याच क्षणी त्याचं शोषण सुरू होतं आर्थिक, मानसिक आणि कधी कधी शारीरिक ही.
या सगळ्यात सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे माणूस हळूहळू स्वतःवरचा विश्वास गमावतो. स्वतःच्या कष्टांवर, क्षमतेवर आणि निर्णयांवर विश्वास ठेवण्या ऐवजी तो बाह्य शक्तींवर अवलंबून राहू लागतो. "मी नाही, तर कुणी तरी दुसरं माझं आयुष्य बदलू शकतं" ही भावना त्याच्या मनात घर करते. आणि इथूनच त्याची खरी हार सुरू होते.
कधी कधी आयुष्यात काही चांगलं घडतं नोकरी लागते, आजार बरा होतो, अडचणी कमी होतात. पण त्या यशाचं श्रेय स्वतःच्या प्रयत्नांना न देता, तो कुणाच्या तरी "कृपे"ला देतो. आणि अशा गोष्टी जेव्हा समाजात पसरतात, तेव्हा त्या आणखी अनेकांना या जाळ्यात ओढतात.
महिलांच्या बाबतीत ही परिस्थिती आणखी गंभीर आहे. अनेकदा घरातील निर्णय त्यांच्यावर लादले जातात. अंधश्रद्धेच्या नावाखाली त्यांना मानसिक आणि कधी कधी शारीरिक त्रास ही सहन करावा लागतो. विश्वास, भीती आणि समाजाच्या दबावाखाली त्यांचा आवाज दाबला जातो. ही केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेची परीक्षा आहे.
सोशल मीडियामुळे या अंधश्रद्धेचं रूप अधिक भयानक झालं आहे. खोट्या चमत्कारांच्या कथा, बनावट अनुभव, भावनिक व्हिडिओ हे सगळं इतक्या वेगाने पसरतं की सत्य आणि असत्य यामधली रेषा धूसर होते. आणि लोक नकळत या आभासी जाळ्यात अडकतात.
खरं तर श्रद्धा ही माणसाला बळ देणारी शक्ती आहे. ती मनाला शांतता देते, आशा देते, धैर्य देते. पण जेव्हा श्रद्धा विवेकाशिवाय आचरणात येते, तेव्हा ती अंधश्रद्धेत रूपांतरित होते. श्रद्धा माणसाला उभं करते, तर अंधश्रद्धा त्याला गुडघ्यावर आणते.
आपल्याला गरज आहे ती बाह्य चमत्कारांवर विश्वास ठेवण्याची नाही, तर स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याची. प्रश्न विचारण्याची, विचार करण्याची आणि सत्य स्वीकारण्याची. आपल्या घरात, आपल्या समाजात विवेकाची ज्योत जिवंत ठेवण्याची.
कारण शेवटी, देव कुठे तरी दूर नसतो. तो आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये असतो, आपल्या चांगल्या विचारांमध्ये असतो, आणि योग्य निर्णय घेण्याच्या धैर्यात असतो. जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो.
आणि हीच खरी प्रगती आहे बाह्य नव्हे, तर अंतर्मनाची.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा