मातीशी लढणारा बाप....!
मातीशी लढणारा बाप....!
“काय सांगावं गड्या…” या एका वाक्यातच एका शेतकऱ्याचं संपूर्ण आयुष्य दडलंय.मातीशी नातं जोडून जगणारा हा माणूस, स्वतःच्या घामानं जमीन ओली करतो… पण नशिब मात्र कोरडंच राहतं.
रात्रंदिवस मातीत राबणं त्याच्यासाठी काही नवीन नाही. उन्हाची तडाखा असो, पावसाचा मारा असो किंवा थंडीची झळ तो कायम शेतातच उभा असतो.पण एवढं सगळं करून ही जेव्हा हातात काहीच राहत नाही, तेव्हा त्याच्या मनात एक वेदना उसळते.“नशिबाला पाझर फुटला नाय…”नशिबाची ही फाटलेली झोळी शिवता शिवता खरंच त्याचं आयुष्य निघून जातं.
जग त्याला “जगाचा बाप” म्हणतं कारण तोच तर आपल्या प्रत्येकाच्या ताटात अन्न वाढतो.पण त्या बापाचं दुःख कुणाला दिसतं का?जेव्हा त्याचं स्वतःचं लेकरू फाटकी चप्पल घालून शाळेला जातं… आणि त्या चप्पलमुळे त्याच्या डोळ्यात पाणी येतं, तेव्हा त्या बापाचं हृदय अक्षरशः तुटतं.त्या क्षणी तो शेतकरी नसतो, तो फक्त एक असहाय बाप असतो… ज्याला स्वतःच्या लेकरासाठी छोटंसं सुख ही देता येत नाही.
शेतकऱ्याची जात म्हणजे संघर्षाची ओळख.रडणं त्याला जमत नाही.कारण त्यानं आयुष्यभर फक्त लढणंच शिकलंय.कधी दुष्काळ, कधी पावसाचं अतिरेक, कधी बाजार भावाचा अन्याय प्रत्येक संकटाशी तो दोन हात करतो.पण जेव्हा नियतीच त्याच्या विरोधात उभी राहते, तेव्हा मात्र त्याला ही हार मानावी लागते.
त्या क्षणी त्याच्या डोळ्यातलं पाणी कुणालाही दिसत नाही…कारण तो रडतोही मातीमध्येच, आणि पुन्हा उभा राहतो ही मातीसाठीच.
तरी ही, दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला की तो पुन्हा नव्या आशेनं शेतात जातो.पुन्हा एकदा बी पेरतो, पुन्हा एकदा स्वप्नं रुजवतो…कारण त्याला माहित असतं. “आज नाही तर उद्या, ही माती मला नक्कीच साथ देईल.”
शेतकरी म्हणजे फक्त अन्नदाता नाही…तो सहनशीलतेचं, जिद्दीचं आणि आशेचं जिवंत उदाहरण आहे.
त्याच्या घामाचा प्रत्येक थेंब हा आपल्या जगण्याचा आधार आहे…आणि म्हणूनच, त्याच्या वेदनांना समजून घेणं, त्याच्या संघर्षाला मान देण.हीच खरी त्याच्या प्रती आपली कृतज्ञता आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा