मागे बोलणाऱ्यांपेक्षा सोबत उभे राहणारेच खरे...!
मागे बोलणाऱ्यांपेक्षा सोबत उभे राहणारेच खरे...!
आयुष्यात एक गोष्ट खूप लवकर समजून घ्यावी लागते.
जगाचं काम आहे बोलणं. आपण काही केलं तरी लोक बोलतात, आणि काही केलं नाही तरीही लोक बोलतात. म्हणून आपल्या मागे कोण काय बोलतं याचा विचार करत बसलो, तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. खरं तर आपल्या मागे बोलणाऱ्यांची हिम्मत इतकीच असते की ते फक्त पाठीमागे बोलू शकतात; समोर येऊन सत्य बोलण्याचं धैर्य मात्र त्यांच्यात नसतं. म्हणूनच जेव्हा लोक आपल्या मागे बोलतात आणि समोर येऊन काही बोलू शकत नाहीत, तेव्हाच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि आपल्या कर्तृत्वाचा खरा विजय झालेला असतो.
या जगात प्रत्येक जण सल्ला देण्यासाठी तयार असतो. “असं कर, तसं करू नको,” “ही वाट सोपी आहे,” “तो मार्ग योग्य नाही” अशा असंख्य गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. वाट दाखवणारे अनेकजण असतात, पण त्या वाटेवर चालायचं काम मात्र आपल्यालाच करावं लागतं. कारण आपल्या स्वप्नांचा भार दुसरं कोणी उचलत नाही, आपल्या संघर्षाचं ओझंही आपल्यालाच वाहावं लागतं. आयुष्याचा प्रवास कितीही लोकांमध्ये सुरू झाला तरी शेवटी तो प्रवास अनेकदा एकट्यालाच पूर्ण करावा लागतो.
या प्रवासात पडणं, अडखळणं, चुका होणं हे सगळं स्वाभाविक असतं. पण जेव्हा आपण पडतो, तेव्हा जगाची खरी ओळख होते. काही लोक आपल्या अपयशावर हसतात, टीका करतात, टोमणे मारतात. त्यांना दुसऱ्याच्या वेदनेत आनंद मिळतो. अशा लोकांची कमतरता कधीच नसते. पण त्याच वेळी काही मोजकी माणसं अशी असतात जी आपल्याला पडलेलं पाहून शांतपणे पुढे येतात, हात पुढे करतात आणि आपल्याला उभं राहायला मदत करतात. हीच ती जिवलग माणसं जी आपल्या आयुष्याची खरी ताकद असतात.
खरं तर आयुष्यात हजारो ओळखी असल्या तरी त्यांना फारसं महत्त्व नसतं. पण जे काही जिवलग असतात, जे आपल्या दुःखातही आपल्या सोबत उभे राहतात, तेच आपल्या आयुष्याचं खरं धन असतं. कारण यशाच्या वेळी तर अनेकजण टाळ्या वाजवतात, पण अपयशाच्या वेळी खांद्यावर हात ठेवणारे फारच कमी असतात.
म्हणून आयुष्य जगताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी.लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, कारण त्यांचं बोलणं कधीच थांबणार नाही. पण जे तुमच्यासोबत मनापासून उभे राहतात, जे तुमच्या पडण्यावर हसत नाहीत तर उठवण्यासाठी हात पुढे करतात, त्यांना मात्र आयुष्यात कधीही दूर जाऊ देऊ नका. कारण त्या मोजक्या जिवलगांच्या साथीतच आयुष्याचा खरा अर्थ आणि खरा विजय दडलेला असतो.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा