काही चेहरे आनंद देतात काही आग लावतात....!


काही चेहरे आनंद देतात काही आग लावतात....!

मुंगूसचं तोंड पाहिलं की दिवस चांगला जातो, अशी एक जुनी समजूत आपल्या गावाकडच्या लोकांमध्ये आजही ऐकायला मिळते. पहाटेच्या धूसर प्रकाशात जर मुंगूस दिसलं, तर मनात नकळत एक आशा जागते.आज काहीतरी चांगलं घडेल. कारण मुंगूस म्हणजे चपळाई, धैर्य आणि संकटावर मात करण्याचं प्रतीक मानलं जातं.

पण आयुष्याचं गणित मात्र इतकं सोपं नसतं. काही वेळा आपल्या आयुष्यात अशीही काही “मुंगूस तोंडची” माणसं येतात की, त्यांचं तोंड पाहिलं की मनात विचित्र कळ उठते. नकळत तळपायाची आग मस्तकात जाते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, नजरेत एक अशी कडवटपणा असतो की आपला शांत दिवसही अस्वस्थ करून टाकतो.

ही माणसं कधी आपलेच असतात नातेवाईक, शेजारी, कधी मित्रही. त्यांच्याकडे पाहिलं की वाटतं, माणूस म्हणून इतकी कटुता मनात कशी साठवता येते? दुसऱ्याच्या आनंदावर पाणी फेरणं, प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता शोधणं, आणि दुसऱ्याच्या मनाला नकळत जखम करणं.जणू त्यांचं रोजचं कामच असतं.

पण खरं सांगायचं तर, अशा माणसांमुळेच आपल्याला चांगल्या माणसांची किंमत कळते. जसं अंधारामुळे दिव्याचा प्रकाश अधिक तेजस्वी वाटतो, तसंच कटु अनुभवांमुळे प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणाचं महत्त्व जास्त जाणवतं.

मुंगूस दिसलं तर दिवस चांगला जाईल की नाही, हे ठामपणे सांगता येत नाही. पण जर आपल्या आसपास प्रेमळ, सकारात्मक आणि मन जपणारी माणसं असतील, तर प्रत्येक दिवस आपोआपच सुंदर होतो. आणि जर आयुष्यात कधी अशी “मुंगूस तोंडची” माणसं भेटलीच, तर त्यांच्याकडून एकच गोष्ट शिकायची आपण कधीही कोणाच्या दिवसाची कटु सुरुवात बनू नये.

कारण शेवटी, एखाद्याच्या चेहऱ्याकडे पाहून जर कोणाच्या मनात शांतता, आशा आणि आनंद निर्माण झाला, तर त्याहून मोठं भाग्य कोणतं असू शकतं?

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !