वर्दीतील समर्पणाचा विजय चोपडा पोलीस उपविभागाची प्रेरणादायी कामगिरी....!
वर्दीतील समर्पणाचा विजय चोपडा पोलीस उपविभागाची प्रेरणादायी कामगिरी....!
सामान्य माणसाच्या आयुष्यात “पोलीस” हा शब्द कधी धाक वाटणारा, तर कधी आधार देणारा असतो. पण जेव्हा पोलीस आपली वर्दी केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर समाजसेवेचे व्रत म्हणून परिधान करतात, तेव्हा विश्वास जन्माला येतो. चोपडा पोलीस उपविभागाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सर्वोत्कृष्ट पोलीस उपविभाग हा मान मिळवला, ही केवळ एक प्रशासकीय उपलब्धी नाही.ती लोकांच्या विश्वासावर उमटलेली मोहोर आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या सक्षम, संयमी आणि प्रेरणादायी नेतृत्वाखाली चोपडा शहर, चोपडा ग्रामीण, धरणगाव आणि अडावद येथील प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदाराने आपले कर्तव्य केवळ आदेश म्हणून नाही, तर जबाबदारी म्हणून निभावले. दिवस असो वा रात्र, ऊन असो वा पाऊस
कायद्याचे रक्षण करताना स्वतःच्या सुख-दुःखाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या वर्दीधारी माणसांनी समाजासाठी स्वतःला झोकून दिले.
गुन्हेगारी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था, नागरिकांशी संवाद, तक्रारींवरील तत्काळ कारवाई आणि मानवी दृष्टिकोनातून दिलेला न्याय या सर्व बाबींमध्ये चोपडा पोलीस उपविभागाने एक आदर्श निर्माण केला. त्यामुळेच आज हा उपविभाग जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर झळकत आहे.
ही कामगिरी एखाद्या एका व्यक्तीची नाही, तर एकत्र चाललेल्या पावलांची आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते शेवटच्या अंमलदारापर्यंत प्रत्येकाने आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली. कुटुंबापासून दूर राहून, अनेकदा स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार बाजूला ठेवून त्यांनी समाजाच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले.यालाच खरी सेवा म्हणावी लागेल.
चोपडा पोलीस उपविभागाचा हा गौरव म्हणजे वर्दीतील माणुसकीचा विजय आहे. ही प्रेरणा केवळ पोलीस खात्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी आहे. कायदा आणि करुणा एकत्र चालू शकतात, हे चोपड्याने सिद्ध करून दाखवले आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप व समस्त पोलीस अधिकारी व अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या सेवेचा प्रकाश असा उजळत राहो आणि समाजाचा विश्वास अधिक दृढ होत राहो हीच सदिच्छा.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा