मीच आहे ना,माझ्यासोबत....!
मीच आहे ना,माझ्यासोबत....!
आयुष्याच्या वाटेवर चालताना प्रत्येकाला कुणाच्या तरी सोबतीची गरज असते. लहानपणापासूनच आपण हात धरून चालायला शिकतो.आईचा, वडिलांचा, मित्रांचा, प्रिय व्यक्तीचा. त्या हातात सुरक्षितता असते, विश्वास असतो, आणि “मी एकटा नाही” ही भावना असते. पण आयुष्य जसजसं पुढे सरकतं, तसतसं एक कठोर सत्य समोर येतं.प्रत्येक हात कायमचा धरून राहीलच असं नाही.
कधी परिस्थिती बदलते, कधी माणसं बदलतात, तर कधी नातीच बदलून जातात. ज्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवलेला असतो, तोच हात अचानक सुटतो. त्या क्षणी मन कोलमडतं, पाय थरथरतात, आणि वाटतं की आता पुढे चालणं अशक्य आहे. पण अशाच क्षणी आयुष्य आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतं.स्वतःचा हात स्वतःच धरायला शिक.
स्वतःचा हात स्वतःच धरायला शिकणं म्हणजे स्वार्थी होणं नव्हे, तर स्वावलंबी होणं आहे. म्हणजे इतरांपासून दूर जाणं नव्हे, तर स्वतःच्या आतल्या ताकदीशी ओळख करून घेणं आहे. कारण बाहेरचा आधार कधीही निघून जाऊ शकतो, पण आतली हिंमत जर जागी असेल, तर कोणतीही साथ सुटली तरी पाय घसरत नाहीत.
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक धक्के बसतात. अपयश, नाकारलं जाणं, विश्वासघात, एकटेपणा हे सगळं आपल्याला आतून पोखरतं. अशा वेळी कोणी आपल्याला समजून घेईल, सावरून घेईल, अशी अपेक्षा असते. पण जेव्हा कुणीच नसतं, तेव्हा स्वतःच स्वतःसाठी उभं राहावं लागतं. स्वतःलाच समजून घ्यावं लागतं, स्वतःच्या वेदनांशी संवाद साधावा लागतो.
स्वतःशी प्रामाणिकपणे बोलायला शिकल्यावर कळतं की आपण कमकुवत नाही, फक्त थकलेलो असतो. आणि थकवा गेला की पुन्हा उभं राहण्याची ताकद आपोआप मिळते. स्वतःचा हात धरून चालायला लागलो, की आपल्याला कुणाच्या अनुपस्थितीची भीती वाटत नाही. कारण आपल्याला माहीत असतं.मी आहे ना, माझ्यासोबत.
ज्याने स्वतःच्या अश्रूंना लपवलं नाही, तर त्यांना वाहू दिलं, तोच खऱ्या अर्थाने मजबूत होतो. कारण भावना दाबणं म्हणजे ताकद नव्हे; त्या स्वीकारून पुढे जाणं म्हणजे खरी हिंमत. स्वतःचा हात धरायला शिकलेला माणूस पडतोही, जखमी ही होतो, पण तो तिथेच थांबत नाही. तो पुन्हा उभा राहतो, कारण त्याला स्वतःवर विश्वास असतो.
कोणी साथ दिली तर आनंद नक्कीच होतो, पण ती साथ नसेल तरी आयुष्य थांबत नाही. कारण आता आपली पावलं दुसऱ्यांच्या आधारावर नव्हे, तर स्वतःच्या आत्मविश्वासावर पडत असतात. आणि हा आत्मविश्वास कुणाकडून मिळत नाही, तो स्वतःमध्येच निर्माण करावा लागतो.
स्वतःचा हात स्वतःच धरायला शिकल्यानंतर माणूस कठोर होत नाही, उलट अधिक संवेदनशील होतो. कारण ज्याने स्वतःच्या वेदना अनुभवल्या आहेत, तो दुसऱ्यांच्या वेदनाही खोलवर समजून घेतो. तो कोणावरही सहज अवलंबून राहत नाही, पण कोणाला दूरही लोटत नाही. तो नात्यांना किंमत देतो, पण स्वतःच्या अस्तित्वाची किंमत त्याहून जास्त जाणतो.शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं
आयुष्याच्या वाटेवर कुणी सोबत असेल तर ती एक भेट आहे, आणि नसेल तर ती एक शिकवण आहे. पण स्वतःचा हात स्वतःच धरायला शिकलं, तर कोणती ही साथ सुटली तरी पाय घसरत नाहीत…कारण तेव्हा आपण केवळ चालत नसतो, तर आत्मविश्वासाने, ठामपणे, स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात असतो.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा