धानोऱ्याच्या मातीचा सुवर्णकिरण डॉ. किरण बाजीराव पाटील....!

धानोऱ्याच्या मातीचा सुवर्णकिरण डॉ. किरण बाजीराव पाटील....!

कष्ट, चिकाटी आणि निस्सीम श्रद्धेच्या बळावर जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कार्यातून समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवते, तेव्हा तिचे यश हे केवळ वैयक्तिक राहत नाही, तर संपूर्ण गावाच्या अस्मितेचे प्रतीक बनते. धानोरा, तालुका चोपडा येथील सुपुत्र वास्तू ऊर्जा एक्सपर्ट व ज्योतिष्य व्होराभूषण डॉ. श्री. किरण बाजीराव पाटील यांना वास्तुशास्त्रातील उत्कृष्ट कार्यसेवेसाठी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली, ही बातमी धानोऱ्याच्या प्रत्येक घरात आनंदाची लहर निर्माण करणारी आहे.

वास्तुशास्त्र ही केवळ दिशा व रचनांची शास्त्रीय मांडणी नसून, मानवी जीवनात संतुलन, शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी एक जीवनदृष्टी आहे. या विद्येचा सखोल अभ्यास करून ती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य डॉ. किरण पाटील यांनी मनोभावे केले. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक संसारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले, अनेक अडचणीत असलेल्या जीवनांना नवी दिशा मिळाली.

या उल्लेखनीय सेवेची दखल घेत भारत सरकारकडून ‘रायझिंग पुरस्कार’साठी त्यांची निवड होणे, हा केवळ त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव नसून, धानोरा गावाच्या संस्कारशील परंपरेचा गौरव आहे. ग्रामीण भागातून आलेल्या एका सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेली ही ओळख अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

या यशाच्या प्रवासात त्यांचा परिवार हा सदैव प्रेरणास्त्रोत व आधारवड ठरला. आई-वडिलांचे संस्कार, कुटुंबीयांचा विश्वास आणि सततची साथ यामुळेच हे यश शक्य झाले. म्हणूनच हे यश किरण पाटील यांच्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण पाटील परिवाराचे आहे.

धानोरा तालुका चोपडा येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने,डॉ. किरण बाजीराव पाटील व त्यांच्या परिवाराचे मनःपूर्वक, खूपखूप अभिनंदन!ईश्वर त्यांच्या हातून असेच समाजोपयोगी, प्रकाशमान कार्य घडवत राहो, हीच सदिच्छा.

धानोऱ्याच्या मातीचा सुगंध आज देशभर पसरला आहे…

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !