चारित्र्यावरचा डाग आयुष्याची न पुसणारी वेदना....!


चारित्र्यावरचा डाग आयुष्याची न पुसणारी वेदना....!

“दाग” हा शब्द किती छोटा… पण त्याचा अर्थ किती खोल!कपड्यावर लागला तर कपडा बेकार होतो, आणि चारित्र्यावर लागला तर आयुष्यच बेकार होतं.

कपड्यावरील डाग आपण साबणाने, पाण्याने, कष्टाने घालवू शकतो. नवीन कपडा घेऊ शकतो. वेळ गेली की तो विसरूनही जातो. पण मनावर, चारित्र्यावर लागलेला डाग? तो ना साबणाने निघतो, ना काळाने सहज पुसला जातो. तो कायम मनाच्या आरशावर उमटलेला राहतो.

कपड्याचा डाग दिसतो बाहेरून; चारित्र्याचा डाग दिसतो नजरेतून. लोकांच्या नजरेत एकदा शंका निर्माण झाली की विश्वासाचं नातं तुटायला वेळ लागत नाही. आणि विश्वास… तो एकदा तुटला की त्याला जोडायला आयुष्य अपुरं पडतं.

एखाद्या शुभ्र पांढऱ्या कपड्यावर काळा ठिपका किती उठून दिसतो ना? तसंच, आयुष्यभर चांगुलपणाने जगलेल्या माणसाच्या आयुष्यात एक चुकीची गोष्ट झाली, की तीच सगळ्यांना दिसते. त्याच्या हजारो चांगल्या कृतींचं मोल कमी होतं.समाजाला चांगुलपणापेक्षा चूक जास्त लवकर दिसते.

चारित्र्य म्हणजे माणसाचं खरं वैभव. पैसा, प्रतिष्ठा, सौंदर्य हे सगळं क्षणभंगुर आहे. पण स्वच्छ चारित्र्य हे आयुष्यभराची कमाई असते. म्हणूनच चारित्र्यावर लागलेला डाग हा फक्त एका व्यक्तीला नाही, तर त्याच्या कुटुंबाला, त्याच्या नात्यांना, त्याच्या स्वप्नांनाही जखम करून जातो.

कपडा फाटला, मळला तर नवीन घेता येतो. पण आयुष्याला दुसरी संधी मिळतेच असं नाही. म्हणून प्रत्येक पाऊल टाकताना विचार करावा लागतो. कारण एक छोटीशी चूक, एक क्षणाचा मोह, एक चुकीचा निर्णय आणि आयुष्यभरासाठी नावावर डाग बसतो.

पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जर डाग नकळत लागला असेल, जर चूक मनापासून मान्य केली असेल, तर पश्चात्तापाची प्रामाणिकता आणि सुधारणेची तयारी हीच खरी धुलाई असते. वेळ लागतो, वेदना होतात, पण स्वच्छ मनाने केलेला प्रयत्न हा हळूहळू विश्वास परत मिळवू शकतो.

“दाग” हा शब्द आपल्याला घाबरवतो, पण तोच शब्द आपल्याला सजगही करतो.तो शिकवतो.कपडे स्वच्छ ठेवण्याइतकंच चारित्र्य स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे.

कारण कपड्यावरील डाग दिसतो काही दिवस,पण चारित्र्यावरचा डाग आठवला जातो अनेक वर्षं…आणि म्हणूनच, आयुष्य सुंदर जगायचं असेल तर कपड्यांपेक्षा मन जपायला शिका.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !